नागेंद्र यांच्या राजीनाम्याने प्रकरण संपले
सतीश जारकीहोळी यांचा दावा : दुष्काळग्रस्त यादीत बदलाची शक्मयता : महिला मंत्र्यांची लवकरच नियुक्ती
प्रतिनिधी/ बेळगाव
पक्षाची प्रतिमा खराब होऊ नये म्हणून बी. नागेंद्र यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून आता हे प्रकरण संपले आहे. नागेंद्र यांच्या राजीनाम्यामुळे पक्षावर परिणाम झाला हे खरे आहे. मात्र पक्षाची आणखी बदनामी होऊ नये म्हणून त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे या विषयावर आता अधिक चर्चा करण्याची गरज नाही. त्यांच्या जागी त्यांच्या समाजातील व्यक्तीला मंत्रिपदाची संधी दिली जाईल. मात्र ही नियुक्ती नेमकी केव्हा करायची, याचा निर्णय सरकार घेईल. राज्यातील काँग्रेस सरकार स्थिर असून पुढेही स्थिरच राहील, असा विश्वास पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त यादीत अद्याप समावेश झालेला नाही. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार दुष्काळग्रस्त भाग निश्चित केला जातो. सध्या केंद्रीय निकषांनुसार यरगट्टी व सौंदत्ती तालुक्मयांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झालेला नाही. मात्र पुढील आठवड्यात यामध्ये बदल होण्याची शक्मयता आहे. केंद्रीय मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच केंद्रीय अभ्यास पथकाने जिल्ह्यात येऊन प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल दिल्यानंतर पुढील कार्यवाही होईल. त्यामुळे दुष्काळ व पीक नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी चिंता करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
काही शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला आहे तर काहींनी घेतलेला नाही. मागीलवेळी केंद्र सरकारच्या मदतीची प्रतीक्षा न करता राज्य सरकारने स्वत: नुकसानभरपाईचे वाटप केले होते. यावेळीही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. हिडकल जलाशय पूर्णक्षमतेने भरले असून दोन कालव्यांमधून पाणी सोडण्यास सुऊवात झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून योग्यपद्धतीने काम करत आहेत. पाणी सोडण्याच्या कामाचा दुसरा टप्पा नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
दोनवेळा निवडणूक लढविणार
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुढाकार घेतल्यास आपण उपमुख्यमंत्री होणार का?, या प्रश्नाला उत्तर देताना जारकीहोळी म्हणाले, सध्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत काँग्रेसमध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही. पूर्वी एकच उपमुख्यमंत्री होते आणि आताही एकच उपमुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्रिपदासाठी सर्वजण इच्छुक असतात. योग्यवेळ आल्यानंतर सर्व काही ठरविले जाईल. आपण आणखी दोनवेळा निवडणूक लढविणार असून चार-पाच जणांना उपमुख्यमंत्री केले तर त्या पदाचे महत्त्वच राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.
महिला मंत्र्यांची लवकरच नियुक्ती
राज्यातील काँग्रेस सरकार सुरक्षित असून ते पुढेही सुरक्षित राहील. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानुसार लवकरच महिला मंत्र्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच विविध महामंडळे आणि मंडळांच्या अध्यक्षपदांवर सामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल. बेळगाव शहर काँग्रेस अध्यक्षपदासाठी इच्छुकांची यादी पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात आली आहे. पक्षाकडून लवकरच नव्या अध्यक्षांची निवड केली जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि. पं. सीईओ राहुल शिंदे, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन आदी उपस्थित होते.