For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बाजार रिकामे, ‘अल् अक्सा’ मशीदही रिकामी

06:12 AM Mar 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
बाजार रिकामे  ‘अल् अक्सा’ मशीदही रिकामी
Advertisement

या युद्धाचा परिणाम मुस्लीमांच्या ईद या सणावर मध्यपूर्वेत मोठ्या प्रमाणात झाला आहे. गेल्या साठ वर्षांमध्ये प्रथमच इस्लामचे महत्वाचे स्थान असणारी ‘अल् अक्सा’ मशीद ईद-उल-फित्रच्या दिवशी बंद ठेवावी लागली आहे. बहुतेक सर्व आखाती देशांमध्ये मोकळ्या मैदानांमध्ये नमाज पढण्यासही बंदी घालण्यात आली होती. या युद्धाचा प्रारंभच रमझान महिन्यात झाला. त्यामुळे ईदच्या दिवशीही इराणवर किंवा इराणकडून अन्य आखाती देशांवर हल्ले केले जातील, या चिंतेपोटी मोकळ्या मैदानांवरील नमाजांवर बंदी घालण्यात आली. अनेक दशकांमधून असा प्रकार प्रथमच घडला आहे, असे अनेक जाणकारांचे मत आहे. या युद्धामुळे यावर्षीचा ईद उल फित्र या सणाची ’रौनक’ मध्यपूर्वेत हिरावून घेतली गेली आहे.

Advertisement

बहुतेक आखाती देशांमधील बाजारपेठाही ईदच्या दिवशी बंद ठेवाव्या लागल्या आहेत. प्रत्यक्ष इराणमध्ये तर परिस्थिती बिकट होती. ईदच्या दिवशीही लोक घराबाहेर पडू शकले नाहीत. एकमेकांना भेटून शुभेच्छा देऊ शकले नाहीत. इराणच्या अनेक भागात अन्नाची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. औषधे आणि पिण्याचे पाणी यांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. या साऱ्या टंचाईचा परिणाम यावर्षीच्या ईदवर होणे स्वाभाविक होते. त्यामुळे ईदला आनंद मावळला होता. संयुक्त अरब अमिरातीत काही स्थानी बाजारांमध्ये रोषणाई करण्यात आली होती. लोकांची खरेदीसाठी गर्दीही दिसत होती. तथापि, नेहमीच्या उत्साहाचा अभाव होता. इराकमध्ये मात्र सणाच्या दिवशी तणावपूर्ण वातावरण दिसून येत होते.

अल् अक्सा मशिदीचे महत्व

Advertisement

इस्लामच्या इतिहासात अल् अक्सा मशिदीचे महत्व मोठे मानले जाते. ही इस्लामसाठी तिसऱ्या क्रमांकाची सर्वात महत्वाची मशीद आहे. 1967 मध्ये इस्रायल आणि अरब देश यांच्यातील युद्धामुळे ही मशीद इतिहासात प्रथमच बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर या युद्धामुळे ती बंद ठेवावी लागली आहे. ईद उल फित्र च्या दिवशी ती बंद राहण्याचा प्रकार प्रथमच घडला असल्याची चर्चा आहे. मक्का, मदीना यांच्यानंतर हे तिसरे सर्वात महत्वाचे इस्लामी स्थळ मानले जाते. या परिसरात ख्रिश्चन, ज्यू आणि मुस्लीम या तीन्ही धर्मांची ऐतिहासिक प्रार्थनास्थळे एकाच स्थानी आहेत. त्यातील एक ही मशीद आहे. इस्रायलमध्येही लोकांनी एकाच स्थानी अधिक जमू नये, असा आदेश काढण्यात आला आहे. एकंदरीतच, या युद्धामुळे मध्यपूर्वेत मुस्लीमांना ईद घरांच्या आतच साजरी करावी लागली आहे.

Advertisement
Tags :

.