8 कंपन्यांचे बाजारमूल्य 1.53 लाख कोटींनी वाढले
सेन्सेक्स होता नव्या उच्चांकावर : इन्फोसिस, भारती एअरटेलचा समावेश
वृत्तसंस्था/ मुंबई
आघाडीवरच्या दहापैकी 8 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यात 1 लाख 53 हजार कोटी रुपयांनी वाढलेले पाहायला मिळाले. भारती एअरटेल आणि आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिस यांच्या बाजार भांडवलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळाली. मागच्या आठवड्यामध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 1279 अंकांनी म्हणजेच 1.57 टक्के इतका वाढला होता. शुक्रवारी सलग नवव्या सत्रामध्ये बीएसई सेन्सेक्स 231 अंकांनी वाढून 82,365 या सर्वकालिक उच्चांकावर बंद झाला होता. दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलचे बाजार भांडवल मूल्य 47 हजार 194 कोटी रुपयांनी वाढून 9,04,587 कोटी रुपयांवर पोहोचले होते.
आयटी कंपन्यांचे मूल्य वाढले
आयटी क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसचे बाजार भांडवल मूल्य 33 हजार 611 कोटी रुपयांनी वाढत 8,06,800 कोटी रुपयांवर तर दुसरीकडे टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसचे बाजार मूल्य 31 हजार 784 कोटी रुपयांनी वाढत 16 हजार 46 हजार 899 कोटी रुपयांवर राहिले होते. बाजार भांडवलाच्या बाबतीमध्ये अग्रक्रमावर असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल 13396 कोटी रुपयांनी वाढत 20 लाख 43 हजार 107 कोटी रुपयांवर पोहोचले होते. यासोबत एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल 5600 कोटी रुपयांनी वाढत 12 लाख 44 हजार 206 कोटी रुपयांवर पोहोचले. जीवन विमा क्षेत्रातील कंपनी एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य 2340 कोटींनी वाढत 6 लाख 73 हजार 390 कोटी रुपयांवर पोहोचले होते.
यांच्या बाजारमूल्यात घसरण
हिंदुस्थान युनिलिव्हरचे भांडवल मूल्य मात्र मागच्या आठवड्यामध्ये घसरणीत दिसून आले. कंपनीचे बाजारमूल्य 8411 कोटी रुपयांनी कमी होत 6 लाख 52 हजार 739 कोटी रुपयांवर राहिले होते. यासोबत आयटीसी या कंपनीचे बाजार भांडवल मूल्यसुद्धा 4776 कोटी रुपयांनी कमी होत 6 लाख 27 हजार 587 कोटी रुपयांवर राहिले होते.
विदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवले 7320 कोटी
ऑगस्टमध्ये आतापर्यंत विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारामध्ये 7320 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. समभागांचे उच्च मूल्यांकन त्याचप्रमाणे बँक ऑफ जपानने व्याजदरामध्ये केलेली वाढ या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावधगिरीची भूमिका निभावली होती. जुलैमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारात 32 हजार 365 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती तर जूनमध्ये 26565 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे........