7 कंपन्यांचे बाजारमूल्य 1.40 लाख कोटींनी वाढले
टीसीएस, इन्फोसिसचे मूल्य वाढले सर्वाधिक : सेन्सेक्स 730 अंकांनी होता वधारला
वृत्तसंस्था/ मुंबई
शेअरबाजारात आघाडीवरच्या 10 पैकी 7 कंपन्यांच्या बाजार भांडवलमूल्यात मागच्या आठवड्यात 1 लाख 40 हजार 863 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि इन्फोसिस यांच्या बाजार भांडवलात सर्वाधिक वाढ झाली आहे. मागच्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 730 अंकांनी म्हणजेच 0.91 टक्के इतका वाढलेला पाहायला मिळाला.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे बाजार भांडवल 67,477 कोटींनी वाढत 15,97,946 कोटी रुपयांवर पोहचले आहे. यासोबत इन्फोसिस या आयटी क्षेत्रातील कंपनीचे बाजारमूल्य 36,746 कोटी रुपयांसह वाढत 7,72,023 कोटी रुपयांवर पोहचले. दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलचे बाजार भांडवल मूल्य 8,45,123 कोटी रुपयांवर पोहचले तर आयसीआयसीआय बँकेचे मूल्य 10,913 कोटींसोबत वाढत 8,36,115 कोटी रुपयांवर पोहचले. एफएमसीजी क्षेत्रातील आयटीसीचे बाजार भांडवल मूल्य 8569 कोटी रुपयांच्या वाढीसह 6,28,399 कोटी रुपयांवर पोहचले. दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिजचे भांडवल मूल्य 5311 कोटी रुपयांसह वाढत 20,00,076 कोटी रुपयांवर पोहचले. हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार भांडवल 117 कोटींसह 6,45,926 कोटी रुपयांवर पोहचले.
21 हजार कोटी काढले
याचदरम्यान शेअरबाजारातून विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये 21,201 कोटी रुपये काढून घेतले आहेत. जुलै महिन्यात बाजारात 32,365 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.
या कंपन्यांचे बाजार भांडवल घटले...
वरील कंपन्यांचे बाजार भांडवल वाढलेले असले तरी काही कंपन्यांचे मूल्य घटलेले दिसले. यामध्ये पाहता एलआयसीचे बाजार भांडवल 47,943 कोटी रुपयांनी कमी होत 6,69,058 कोटी रुपयांवर खाली आले. एचडीएफसी बँकेचे बाजार मूल्य 13,064 कोटींनी घटत 12,43,441 कोटी रुपयांवर तर स्टेट बँकेचे बाजार मूल्य 10,486 कोटींनी घटत 7,25,080 कोटी रुपयांवर स्थिरावले होते.