नव्या वर्षी बाजाराचा शुभारंभ अल्पशा तेजीने
दोन्ही निर्देशांकानी गाठला सर्वोच्च स्तर : बँकिंग, ऑटो क्षेत्र दबावात
वृत्तसंस्था/ मुंबई
नव्या वर्षाचा शुभारंभ शेअरबाजाराने काहीशा तेजीसोबत बंद होत केला आहे. दुसरीकडे सोमवारी सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकाने नवी सर्वोच्च पातळी गाठली होती. बँकिंग आणि ऑटो क्षेत्रांचे निर्देशांक दबावात राहिले होते.
सोमवारी वर्षाच्या आरंभी शेअरबाजारात सकाळी किंचीत घसरण दिसून आली होती. अखेर सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 31 अंकांनी वाढून 72,271 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 10 अंकांनी वधारत 21,741 अंकांवर बंद झाला होता. यामध्ये अदानी समूहातील अदानी पोर्टस, अदानी एंटरप्रायझेस, एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी नेस्ले यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले होते. नव्या वर्षी पहिल्या दिवशी एकंदर बाजारात मिळताजुळता कल होता. दुसरीकडे नववर्षानिमित्त जागतिक बाजार बंद होते. शेवटच्या अर्ध्या तासात सर्वोच्च स्तरावरुन घसरणीचा अनुभव शेअरबाजाराने अनुभवला. दिवसभरातील व्यवहारात सेन्सेक्स निर्देशांकाने सर्वकालीन 72,562 अंकांपर्यंत झेप घेतली होती तर निफ्टीनेही 21,834 अंकांपर्यंत सर्वोच्च पातळी गाठली होती. दुपारी 2 नंतर निफ्टीने 21,760 अंकांची पातळी ओलांडत वर जाण्याचा प्रयत्न केला. 3 नंतर तर निफ्टी 100 अंकांनी तेजीत होता, पण नंतर विक्रीचा दबाव झाला आणि निफ्टी घसरणीकडे झुकला.
हे समभाग वधारले, घसरले
समभागांच्या कामगिरीचा विचार करता नेस्ले इंडिया यांचा समभाग 3 टक्के इतका वधारत बंद झाला. अदानी एंटरप्रायझेस 1.90 टक्के, अदानी पोर्टस् 1.60 टक्के, टेक महिंद्रा 1.50 टक्के आणि कोल इंडिया 1.54 टक्के इतका वधारत बंद झाले होते. टाटा मोटर्स, एचसीएल टेक, आयटीसी, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रिज यांचे समभागही तेजी राखत बंद झाले. तर दुसरीकडे घसरणीत आयशर मोटर्स 2.53 टक्के, भारती एअरटेल 1.85 टक्के, बजाज ऑटो 1.41 टक्के यांचा समावेश होता.
तिमाही निकाल येणार
कंपन्यांचे आगामी काळात डिसेंबर तिमाहीचे नफ्या तोट्याचे निकाल जाहीर होणार आहेत. निकालाचा कमी अधिक परिणाम त्या त्या कंपन्यांवर दिसतील. शुक्रवारी अमेरिकेतील बाजार अल्पशा घसरणीसोबत बंद झाले होते. शुक्रवारी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1459.12 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली होती.