‘धातू-दूरसंचार’च्या कामगिरीने बाजार सावरला
दिवसभरात सेन्सेक्स 690 तर निफ्टी 215 अंकांनी मजबूत
नवी दिल्ली :
चालू आठवड्यातील पहिल्या दिवशी मंगळवारी बाजारात मोठी पडझड झाल्याचे दिसून आले. यामध्ये सेन्सेक्सची जवळपास 1000 अंकांनी घसरण झाली होती. यासोबतच निफ्टीही प्रभावीत होत बंद झाला होता. परंतु दुसऱ्याच दिवशी बुधवारी मात्र भारतीय भांडवली बाजारात धातू आणि दूरसंचार क्षेत्रातील सकारात्मक कामगिरीमुळे भारतीय बाजार सावरल्याचे दिसून आले. बुधवारी सेन्सेक्स 690 अंकांनी वधारुन बंद झाला. यामुळे बाजारातील दबावजन्य स्थितीला पूर्ण विराम मिळाला.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 689.76 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.98 टक्क्यांसोबत 71,060.31 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसखेर 215.15 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 1.01 टक्क्यांसोबत 21,453.95 वर बंद झाला.
मुख्य कंपन्यांमध्ये बुधवारी टाटा स्टीलचे समभाग हे सर्वाधिक 3.77 टक्क्यांनी मजबूत होत निर्देशांक सर्वाधिक तेजीत राहिले. यासह एचसीएल टेक 3.62 टक्के, इंडसइंड बँक 3.60, पॉवरग्रिड कॉर्प 3.34 हे लाभात राहिले. तसेच टेक महिंद्रा, हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज फिनसर्व्ह आणि भारती एअरटेल यांचे समभाग वधारुन बंद झाले आहेत.
अन्य कंपन्यांमध्ये आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, एशियन पेन्ट्स, बजाज फायनान्स आणि टीसीएस यांचे समभाग हे 2.94 टक्क्यांनी घसरणीत राहिले आहेत. सेन्सेक्समधील एकूण 30 मधील 25 समभाग हे लाभात राहिले आहेत. निफ्टीमधील 50 समभागांमधील 43 समभाग हे फायद्यामध्ये राहिल्याची नेंद केली आहे.
जागतिक घडामोडींचा परिणाम.......
आशियातील अन्य बाजारांमध्ये जपानचा निक्की हा नुकसानीत राहिला, तर हाँगकाँगचा हँगसेंग आणि चीनचा शांघाय हा वधारुन बंद झाला. युरोपमधील मुख्य बाजारांमध्ये जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटन यांचे निर्देशांक सुरुवातीला तेजीत राहिले होते. अमेरिकन बाजारात मंगळवारी मिळता जुळता कल होता. जागतिक पातळीवर तेल मानक ब्रेंट क्रूड 0.58 टक्क्यांनी वधारुन 80.01 डॉलर प्रति बॅरेल राहिले होते.