बाजारात रंगीबेरंगी पणत्या-दिव्यांची भुरळ
दिवाळी चार दिवसांवर : पावसाने उसंत घेतल्याने खरेदीची लगबग : कुंदन वर्क केलेल्या पणत्या-दिव्यांना पसंती
बेळगाव : अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारी दिवाळी अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे बाजारपेठेत दिवाळी साहित्याचा बहर आला आहे. दिवाळीसाठी लागणाऱ्या विविध रंगीबेरंगी पणत्या आणि दिवे दाखल झाले आहेत. दोन दिवसांपासून पावसाने काहीशी उसंत घेतल्याने खरेदीची लगबग पाहावयास मिळत आहे. दिव्यांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळीत पणती आणि दिव्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. बाजारात विविध आकारातील आणि डिझाईनमधील रंगीबेरंगी दिवे आणि पणत्या भुरळ घालू लागल्या आहेत. त्याबरोबरच आकाश कंदील, मेणबत्त्या, रांगोळी, मातीचे दिवे, तोरण, शुभलाभ, लक्ष्मीची पावले आदी साहित्यही विक्रीसाठी दाखल झाले आहे.
बाजारात विविध आकारांमध्ये पणत्या आणि दिवे दाखल झाले आहेत. पारंपरिक मातीच्या पणत्या आणि दिवे आकर्षण ठरू लागले आहेत. तसेच सिरॅमिकच्या पणत्याही दिसत आहेत. पारंपरिक मातीच्या पणत्यांचा दर 20 ते 50 रुपये डझन असा आहे.सिरॅमिकच्या पणत्या 50 ते 100 रुपये डझन अशी विक्री चालू आहे.
कुंदन वर्कची क्रेझ
पणती आणि दिव्यांना टिकल्या, मोती, घुंगरू लावून सजविले जात आहे. त्यामुळे कुंदन वर्कची क्रेझ आल्याचे दिसत आहे. त्याबरोबरच चमचमही दिसत आहे. आकर्षण ठरत असलेल्या या पणत्या आणि दिव्यांना मागणीही वाढू लागली आहे. विशेषत: तरुणी आणि महिलांकडून कुंदन वर्क केलेल्या पणत्या-दिव्यांना पसंती दिली जात आहे.
रंगीबेरंगी पणत्यांचा ट्रेंड
बाजारात पारंपरिक पणत्यांबरोबरच आकर्षक रंगीबेरंगी पणत्यांचा ट्रेंड पाहावयास मिळत आहे. विविध रंगांमध्ये पणत्या आणि दिवे दाखल झाले आहेत. 20 ते 50 रुपये प्रत्येकी असा त्यांचा दर आहे. त्यामुळे पारंपरिक पणत्यांबरोबर रंगीत साज चढलेला दिसत आहे. स्थानिक पणत्यांचे उत्पादन कमी झाल्याने अहमदाबाद-गुजरात आणि तामिळनाडू येथूनही पणत्या आणि दिवे दाखल झाले आहेत.
दरात काहीशी वाढ
लाकूड, कच्चा माल, मजुरी आणि इतर गोष्टी वाढल्याने दिवे आणि पणत्यांच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत पणत्यांसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. मात्र, पारंपरिक मातीच्या पणत्या 15 ते 20 रुपये डझनप्रमाणे विक्री होऊ लागली आहे.
बाजारात दिवाळीच्या खरेदीला ऊत
दिवाळीला वसुबारसपासून प्रारंभ होणार आहे. 29 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी, 31 रोजी नरकचतुर्दशी, 1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन, 2 नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदा पाडवा तर 3 नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात दिवाळीच्या खरेदीला ऊत येऊ लागला आहे.