For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुढीपाडव्यासाठी बाजारपेठ सजली

10:40 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुढीपाडव्यासाठी बाजारपेठ सजली
Advertisement

साखरमाळा, इलेक्ट्रीक वस्तू, सोने, चांदीला पसंती : विविध साहित्यांनी शोरुम सज्ज

Advertisement

बेळगाव : गुढीपाडवा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठ गुढीपाडव्याच्या साहित्याने सजू लागली आहे. विशेषत: साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर नवीन वस्तू खरेदीला अधिक पसंती दिली जाते. त्यामुळे बाजारात नवीन वस्तू खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ पाहायला मिळत आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोने, चांदी, नवीन वाहने आदींची खरेदी मोठ्या प्रमाणात होणार आहे. शहरातील पांगुळ गल्ली, गणपत गल्ली, मारुती गल्ली, मेणसी गल्ली, खडेबाजार, कडोलकर गल्ली आदी ठिकाणी गुढीपाडव्याचे साहित्य दिसून येत आहे. विशेषत: बुरूड गल्लीत गुढी उभारण्यासाठी लागणाऱ्या काठ्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. गुढीपाडव्यासाठी पंचांग, साखरगाठी, रेशमी वस्त्र, कडुलिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या, फुलांच्या माळा, तांबे, पितळ, रांगोळी, पताका, गुढी उभारण्यासाठी बांबूची काठी खरेदी केली जाते. त्यामुळे येत्या दोन दिवसांत बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढणार आहे. गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौकात, काही दुकानांमध्ये साखरमाळा दिसून येत आहेत. 30 रुपयांना एक याप्रमाणे त्यांची विक्री होऊ लागली आहे. साखरेच्या दरात वाढ झाल्याने साखरमाळांचा दर काहीसा वाढला आहे. पिवळ्या, पांढऱ्या, लाल, हिरव्या रंगात साखरमाळा विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर विशेषत: सोने, नवीन वाहने,

Advertisement

इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि गृहोपयोगी साहित्य खरेदीला पसंती दिली जाते. त्यामुळे विविध शोरुम साहित्यांनी सज्ज झाली आहेत. शहरात सराफी दुकाने आणि शोरुममध्ये आतापासून नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. त्याचबरोबर शोरुममध्ये वाहनांसाठी आगाऊ बुकींग केले जात आहे. अलीकडे इलेक्ट्रीक वाहनांची क्रेझ  आली आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर इलेक्ट्रीक वाहनांची खरेदी होणार आहे. विक्रेत्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर दिल्या आहेत. गुढीपाडव्यादिवशी घरांसमोर गुढी उभारली जाते. त्यामुळे बुरूड गल्ली आणि मेणसी गल्लीत गुढीच्या काठ्या विक्रीसाठी ठेवल्या आहेत. 100 ते 200 रुपये असा या काठ्यांचा दर आहे. एकूणच गुढीपाडव्यासाठी बाजारात विविध साहित्याची रेलचेल पाहावयास मिळू लागली आहे.

Advertisement
Tags :

.