For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रमजाननिमित्त खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

10:58 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
रमजाननिमित्त खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी
Advertisement

वेगवेगळे खाद्य पदार्थांचे स्टॉल : बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण

Advertisement

बेळगाव : इस्लाम धर्माचा पवित्र महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमजान-ईदच्या शेवटच्या दिवशी शहरामध्ये मुस्लीम बांधवांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. नवीन कपडे, अत्तर, खाद्य पदार्थांची खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली. तर खडेबाजार, दरबार गल्लीत वेगवेगळे खाद्य पदार्थांचे स्टॉल मांडले होते. या ठिकाणी खवय्यांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. रमजान-ईदचा शेवटचा दिवस असल्याने बाजारपेठ बहरली होती. खडेबाजार, दरबार गल्ली, खंजर गल्ली आदी भागामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने खरेदीला उधाण आले होते. बुधवारी सायंकाळी 7 च्या दरम्यान शेवटचा नमाज झाल्यानंतर मुस्लीम बांधवांनी उपवास सोडण्यासाठी बाजारपेठेत मांडण्यात आलेल्या चमचमीत खाद्य पदार्थांवर ताव मारला. त्यामुळे सायंकाळी मोठी गर्दी झाली होती. वेगवेगळ्या खाद्य पदार्थांसह खारीक, खजूर, बेदाणे, काजू, पिस्ता, अक्रोड आणि शेवय्या, सुकामेवा खरेदी करण्यासाठी अधिक गर्दी झाली होती. याबरोबर नवनवीन कपडे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमुळे दुकाने गर्दीने फुलून गेली होती. तसेच रस्त्यावर कपडे विक्रेत्यांपासून ते अत्तर, मेहंदी कोन, बांगड्या आदी वस्तुंच्या विक्रेत्यांनी गर्दी केली होती. अनेक मुस्लीम बांधवांनी खंजर गल्लीमध्ये फळफळावळे वाटून आनंद साजरा केला. गोर-गरिबांना अनेकांकडून दान दिले जात होते. गुरुवारी इदगा मैदानावर नमाज पठण करून एकमेकाला शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. या दृष्टीने मैदानावर तयारी करण्यात आली आहे.

ईदगाह मैदानावर सामूहिक नमाजपठण होणार

Advertisement

शहरात रमजान-ईद गुरुवारी सकाळी 9.30 वाजता करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंजुमन ईदगाह मैदानावर सामूहिक नमाजपठण होणार आहे, असे अंजुमनचे अध्यक्ष आमदार राजू सेठ यांनी सांगितले. मंगळवारी सायंकाळी अंजुमन सभागृहात कमिटीची बैठक पार पडली. बैठकीत शहराचे मुफ्ती मौलाना आणि समाज प्रमुख उपस्थित होते. बुधवारी चंद्र न दिसल्याने 30 रोजे पूर्ण करून गुरुवारी रमजान-ईद साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार राजू सेठ यांनी बेळगावच्या जनतेला यावेळी शुभेच्छा दिल्या. या बैठकीला जमातीचे प्रमुख उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.