चढउताराच्या प्रवासात बाजार तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
आशियातील बाजारांमध्ये मंगळवारी दुसऱ्या सत्रात तेजीचा कल राहिल्याचा प्रभाव म्हणून भारतीय भांडवली बाजारात तेजीचा माहोल राहिल्याचे दिसून आले. दिग्गज कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांच्या खरेदीमुळे बाजारात मजबूत तेजी राहिली होती.
मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 482.70 अंकांनी वधारुन निर्देशांक 71,555.19 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 127.20 अंकांच्या मदतीने 21,743.25 वर बंद झाला आहे.
बँकिंग समभागांची चमक
विविध क्षेत्रांपैकी मंगळवारी बँकिंग क्षेत्रातील समभागांमधील खरेदीमुळे बाजारात चमक राहिली होती. यामध्ये आयसीआयसीआय बँकेचे समभाग 2.46 टक्क्यांनी सर्वाधिक तेजीने वधारुन बंद झाले आहेत. यासोबतच अॅक्सिस बँक, कोटक बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग वधारुन बंद झाले आहेत.
अन्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास यामध्ये फक्त 5 कंपन्यांचे समभाग घसरणीत राहिले यात महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, टाटा मोर्ट्स आणि आयटीसी या कंपन्यांचा समावेश आहे.
पेटीएमध्ये घसरण
आरबीआयकडून करण्यात आलेल्या कारवाईचा परिणाम म्हणून पेटीएमचे समभाग हे मागील काही दिवसांपासून घसरणीत आहेत. यामध्ये मंगळवारच्या सत्रात कंपनीचे समभाग जवळपास 10 टक्क्यांनी घसरुन 380.35 रुपयांवर राहिले आहेत.
रिलायन्सचे बाजारमूल्य विक्रमी टप्प्यावर
रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग हे 1.89 टक्क्यांनी मंगळवारी वधारले आहेत. या वाढीसोबत समभाग 2957.80 रुपयांवर राहिले. या तेजीसह कंपनीने बाजारमूल्याचा विक्रम प्राप्त करत बाजारमूल्य जवळपास 20 लाख कोटी रुपयांच्या घरात पाहोचले आहे. याचा फायदा हा भारतीय शेअरबाजाराला झाल्याचे दिसून आले.
सध्याच्या बाजारामधील कामगिरीचा परिणाम हा आगामी काळात बाजारात किती कालावधीपर्यंत राहतो हे पाहावे लागणार असल्याचेही काही शेअर बाजार अभ्यासकांनी नमूद केले आहे.