For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंतिम सत्रात बाजार घसरणीसह बंद

06:22 AM Nov 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
अंतिम सत्रात बाजार घसरणीसह बंद
Advertisement

सेन्सेक्स 55 तर निफ्टी 51 अंकांनी नुकसानीत : तिमाही निकालांसह विदेशी स्थितीमुळे बाजार प्रभावीत

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी जागतिक बाजार आणि आयटी समभागांमध्ये वाढ होऊनही भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेनुसार न आल्याने आणि परदेशी गुंतवणूकदारांनी विक्री सुरू ठेवल्याने बाजार नुकसानीत राहिल्याचे दिसून आले.

Advertisement

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने सेन्सेक्स दिवसअखेर 55.47 अंकांनी घसरुन  निर्देशांक 79,486.32 वर बंद झाला. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील 51.15 अंकांच्या घसरणीसह 24,148.20 वर बंद झाला. निफ्टीच्या 50 कंपन्यांपैकी 27 कंपन्यांचे समभाग घसरले तर 23 कंपन्यांचे समभाग तेजीत राहिले आहेत.

सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी एशियन पेंट्सचा शेअर सर्वाधिक 2.62 टक्क्यांनी घसरुन बंद झाला. याशिवाय टाटा स्टील, एसबीआय, टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, टीसीएस, अल्ट्रा सिमेंट आणि मारुती यांचे समभाग घसरणीत राहिले.

दुसरीकडे, महिंद्रा अँड महिंद्राचे समभाग सर्वाधिक 2.69 टक्क्यांनी वधारुन बंद झाले. टायटन, टेक महिंद्रा, नेस्ले इंडिया, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, अदानी पोर्ट्स, जेएसडब्ल्यू आणि सनफार्माचे शेअर्सही वधारले.

 बाजारात घसरण

वेगवेगळ्या कारणांमुळे भारतीय शेअर बाजारात घसरण झाली. घसरणीचे सर्वात मोठे आणि प्राथमिक कारण म्हणजे परदेशी गुंतवणूकदार, जे भारतीय शेअर बाजारातून सतत पैसे काढून घेत आहेत. शेअर बाजारातील घसरणीचे दुसरे प्रमुख कारण म्हणजे कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल, जे अद्याप गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेले नाहीत. त्याचबरोबर रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीनेही बाजाराला खाली खेचले.

रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले की, या क्षेत्रातील संमिश्र कल शेअर बाजाराच्या भविष्यातील दिशेबाबत अनिश्चित आहे. गेल्या आठवड्यातील घसरणीनंतर आयटी समभागात तेजी आली आहे, तर बँकिंग क्षेत्रही अडचणीत आहे. ते म्हणाले की, सध्याचा दृष्टिकोन पाहता, स्पष्ट संकेत येईपर्यंत गुंतवणूकदारांनी सावध राहावे.

गुंतवणुकदार या कालावधीचा उपयोग चांगल्या मूल्यांकनात दर्जेदार स्टॉक्स निवडण्यासाठी देखील करू शकतात. विदेशी गुंतवणूकदारांनी 4,888.77 कोटी रुपये काढून घेतले.

Advertisement
Tags :

.