तीन कंपन्यांचे बाजारभांडवल मूल्य 70 हजार कोटींनी वाढले
वृत्तसंस्था / मुंबई
देशातील आघाडीवरच्या 10 पैकी 3 कंपन्यांचे बाजारभांडवल मूल्य मागच्या आठवड्यामध्ये 70हजार 312 कोटी रुपयांनी वाढले असल्याचे दिसून आले. यामध्ये दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज बाजार भांडवल वाढविण्यामध्ये आघाडीवर राहिली होती.
रिलायन्स सोबत एचडीएफसी बँक आणि हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपन्यांचे बाजारभांडवल मागच्या आठवड्यात वाढले होते तर दुसरीकडे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयटीसी, भारती एअरटेल आणि एलआयसी या कंपन्यांच्या बाजारभांडवलामध्ये मात्र घसरण झालेली पहायला मिळाली. मागच्या आठवड्यामध्ये बीएसई सेन्सेक्स 376 अंकांनी घसरणीत राहिला होता.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारभांडवल मूल्य 47 हजार 21 कोटी रुपयांनी वाढत 17 लाख 35 हजार 194 कोटी रुपयांवर पोहोचले होते. हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजारभांडवल मूल्य 12 हजार 241 कोटीनी वाढत 6 लाख 5 हजार 43 कोटी आणि एचडीएफसी बँकेचे 11 हजार 49 कोटींनी वाढून 12 लाख 68 हजार 143 कोटी रुपयांवर पोहोचले होते.