आघाडीवरच्या 6 कंपन्यांचे बाजार भांडवल 57 हजार कोटींनी घटले
टीसीएस, एचडीएफसी बँकेचा समावेश : 2 कंपन्यांचे भांडवल वाढले
वृत्तसंस्था/ मुंबई
आघाडीवरच्या 10 पैकी 6 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यामध्ये 57 हजार कोटींनी घटले असल्याचे दिसून आले आहे.
10 पैकी 6 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यामध्ये जवळपास 57,408 कोटी रुपयांनी घसरले असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि एचडीएफसी बँक या दोन कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. मागच्या आठवड्यामध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 211 अंकांनी घसरणीत राहिला होता. 1 जानेवारी रोजी मात्र सेन्सेक्स निर्देशांकाने 72,561 अंकांचा सर्वकालीन उच्चांकी स्तर गाठला होता.
या कंपन्यांच्या भांडवलात घट
टीसीएसचे बाजार भांडवल मूल्य 20929 कोटी रुपयांनी घटून 13 लाख 67 हजार 661 कोटी रुपयांवर राहिले होते. एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल मूल्य 20 हजार 536 कोटी रुपयांनी घटून 12 लाख 77 हजार 435 कोटी रुपयांवर राहिले होते. हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडचे बाजार भांडवलदेखील 10 हजार 114 कोटी रुपयांनी घटून 6 लाख 15 हजार 663 कोटी रुपयांवर घसरले आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी इन्फोसिससुद्धा मागच्या आठवड्यामध्ये बाजार भांडवलाच्या बाबतीत घसरणीत राहिली होती. कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 4 हजार 129 कोटी रुपयांनी घटून 6 लाख 36 हजार 222 कोटी रुपयांवर राहिले होते.
दोन कंपन्यांचे भांडवल वाढले
दुसरीकडे दिग्गज उद्योग समूह रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे बाजार भांडवल मात्र 14,816 कोटी रुपयांनी वाढून 17 लाख 63 हजार 644 कोटी रुपये इतके राहिले होते. आयटीसी या कंपनीचे बाजार भांडवलसुद्धा 14,409 कोटी रुपयांनी वाढून 5 लाख 91 हजार 219 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.