9 कंपन्यांचे बाजार भांडवल 1.30 लाख कोटींनी वाढले
मुंबई :
मागच्या आठवड्यामध्ये शेअर बाजारात 9 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य वाढले आहे. फक्त रिलायन्स या कंपनीचे बाजार भांडवल मूल्य घसरणीत राहिले होते.
देशातील आघाडीवरच्या 10 कंपन्यांपैकी 9 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यात 1,30,391.96 कोटी रुपयांनी वाढले होते. यामध्ये भारती एअरटेल व टाटा कन्सल्टंन्सी सर्व्हिसेस यांचे बाजारमूल्य सर्वाधिक वाढलेले पहायला मिळाले. भारती एअरटेलचे भांडवल मूल्य 23,746 कोटी रुपयांनी वाढून 5,70446 कोटी रुपयांवर पोहोचले तर टीसीएसचे मूल्य 19,027 कोटी रुपयांनी वाढून 12,84,180 कोटी रुपयांवर पोहोचले. यासोबत तिसऱ्या नंबरवर असणाऱ्या एचडीएफसी बँकेच्या बाजार भांडवलात 17,881 कोटी रुपयांची भर पडून ते 11,80,588 कोटी रुपयांवर पोहोचले होते.
आघाडीवरच्या 10 कंपन्यांपैकी रिलायन्सचे भांडवल मूल्य घसरलेले असले तरी आजही सर्वाधिक मूल्यवान कंपनी म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, भारती एअरटेल, आयटीसी, भारतीय स्टेट बँक आणि बजाज फायनान्स यांचा आघाडीवरच्या कंपन्यांच्या क्रमवारीत नंबर लागतो.