8 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 1.66 लाख कोटींनी घसरले
रिलायन्स, एलआयसी सर्वाधिक तोट्यात : 1200 अंकांनी सेन्सेक्स होता घसरणीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आघाडीवरच्या दहापैकी 8 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यामध्ये 1.66 लाख कोटी रुपयांनी घटले असल्याचे दिसून आले आहे. यात लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे बाजार भांडवल मूल्य सर्वाधिक कमी झाले असल्याचे दिसून आले आहे.
एकंदर पाहता मागच्या आठवड्यामध्ये 8 कंपन्यांचे बाजारमूल्य 1 लाख 66 हजार 954 कोटी रुपयांनी घटले आहे. मागच्या आठवड्यात 30 समभागांचा बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 1276 अंकांनी घसरणीत राहिला होता. याच दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल मूल्य 33 हजार 930 कोटी रुपयांनी कमी होऊन 19 लाख 94 हजार 765 कोटी रुपयांवर आले होते. त्याचप्रमाणे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एलआयसीचे बाजारमूल्य 30676 कोटी रुपयांनी घटून 7 लाख 17 हजार 01 कोटी रुपयांवर राहिले होते. त्याचप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार मूल्य 21,151 कोटी रुपयांनी घसरून 7 लाख 35 हजार 566 कोटी रुपयांवर राहिले होते.
आयटी कंपन्याही प्रभावीत
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसचे बाजार मूल्यसुद्धा 20973 कोटी रुपयांनी घटत 7 लाख 35 हजार 277 कोटी रुपयांवर राहिले. यासोबतच टीसीएसचे बाजार मूल्य 19157 कोटी रुपयांनी कमी होत 15 लाख 30 हजार 469 कोटी रुपयांवर राहिले. भारती एअरटेलचे बाजार मूल्य 16,993 कोटी रुपयांनी घटत 8 लाख 33 हजार 396 कोटींवर राहिले.
यांच्या भांडवलमूल्यात वाढ
दुसरीकडे दोन कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मात्र वाढलेले पाहायला मिळाले. यामध्ये हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार मूल्य 12 हजार 946 कोटी रुपयांनी वाढलेले होते. सदरचे कंपनीचे बाजार मूल्य यायोगे 6 लाख 45 हजार 808 कोटी रुपयांवर पोहोचले. याच्या जोडीला आयटीसीचे मूल्य 8406 कोटी रुपयांनी वाढत 6 लाख 19 हजार 829 कोटी रुपयांवर पोहोचले.
विदेशी गुंतवणूकदारांनी 13 हजार कोटी काढले
ऑगस्ट महिन्यामध्ये विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी 13400 कोटी रुपये भारतीय शेअर बाजारातून काढले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अमेरिकेमध्ये मंदीची माहिती मिळताच शेअर बाजारामध्ये गुंतवणूकदार सावध झाले होते. यावर्षी आत्तापर्यंत विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 22 हजार 134 कोटी रुपयांची समभागांमध्ये गुंतवणूक केली आहे. ऑगस्ट 1 ते 9 या कालावधीमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी 13,431 कोटी रुपये बाजारातून काढून घेतले आहेत.