बाजारातील तेजीची चमक कायम
बुधवारच्या सत्रात सेन्सेक्स 662 तर निफ्टी 205.85 अंकांनी मजबूत : झोमॅटो, इन्फोसिसचे समभाग वधारले
मुंबई :
चालू आठवड्यातील तिसऱ्या दिवशी बुधवारी आणि सलगच्या दुसऱ्या सत्रात बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी यांच्या निर्देशांकांतील तेजीची चमक कायम राहिल्याचे दिसून आले. लवकरच सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प आणि विविध कंपन्यांचे सादर होणारे तिमाही अहवाल यांचा सकारात्मक परिणाम भारतीय बाजारावर होत आहे. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 631.55 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.83 टक्क्यांसह 76,532.96 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 205.85 अंकांनी वधारुन निर्देशांक 23,163.10 वर बंद झाला आहे.
मुख्य कंपन्यांमध्ये झोमॅटोचे समभाग हे 7 टक्क्यांनी वधारले आहेत. यासह टाटा मोटर्स, इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आणि बजाज फायनान्स यांचे समभाग हे तेजीसह बंद झाले आहेत. दुसऱ्या बाजूला निफ्टीमधील कंपन्यांमध्येही तेजी राहिली आहे. यामध्ये श्रीराम फायनान्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, टाटा मोटर्स, स्टेट बँक लाईफ यांचे समभाग हे 3.98 टक्क्यांनी वधारले आहेत. तसेच भारती एअरटेल आयटीसी हॉटेल्स, मारुती सुझुकी, ब्रिटानिया आणि एशियन पेन्ट्सयासह 8 समभाग नुकसानीत राहिले आहेत. जागतिक बाजारांमध्ये सकारात्मक वातावरण राहिल्याने भारतीय बाजारातही त्याचे पडसाद राहिले आहेत. आशियातील बाजारात सियोल आणि टोकीओ हे वधारुन बंद झाले आहेत. तसेच शांघाय आणि हाँगकाँग या बाजारांना सुट्टी राहिली होती. युरोपीयन बाजारात तेजीचा कल राहिला होता.
शेअर बाजारातील अधिकृत आकडेवारीनुसार विदेशी संस्थांच्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी 4,920.69 कोटी रुपयाचे समभागांची विक्री झाली आहे. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंटक्रूड 0.93 टक्क्यांनी घसरुन 76.77 प्रति डॉलर वर राहिला आहे.
अर्थसंकल्पाकडे नजरा
केंद्रीय अर्थसंकल्प लवकरच सादर करण्यात येणार आहे. सदरचा अर्थसंकल्प हा पाच वर्षांसाठी सादर करण्यात येणार आहे. यामुळे यावेळी सर्वाधिक घोषणा सरकारकडून केल्या जाणार असल्याच्या अपेक्षामुळे बाजारात सकारात्मक स्थिती निर्माण झाली आहे. नवीन रोजगार निर्मिती, विविध प्रकल्पांना चालना यासह अन्य मुद्यांचा अर्थसंकल्पात विचार होणार असल्याचे संकेत निर्माण होत आहेत.