दुसऱ्या सत्रात बाजारात तेजी परतली
सेन्सेक्स 455 तर निफ्टी 157 अंकांनी वधारला
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक हे तेजीसह बंद झाले आहेत. यामध्ये आशियातील बाजारांमध्ये मिळताजुळता कल राहिल्याचा फायदा हा बाजाराला झाला आहे. टीसीएस आणि इन्फोसिस या आयटी कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेला लिलाव व विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे भारतीय बाजारात तेजीचा माहोल परतल्याचे दिसून आले.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने भारतीय बाजारात सेन्सेक्स 240 अंकांवर खुला झाला होता, तर दिवसअखेर 454.67 अंकांच्या मजबुतीसह निर्देशांक 72,186.09 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 157.70 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 21,929.40 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये मंगळवारी एचसीएल टेक, टाटा कंसल्टेंसी सर्व्हिसेस, मारुती सुझुकी, विप्रो, लार्सन अॅण्ड टुब्रो, इन्फोसिस, टाटा स्टील, भारती एअरटेल, भारतीय स्टेट बँक, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट आण महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे समभाग मंगळवारी वधारुन बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये पॉवरग्रिड, इंडसइंड बँक, आयटीसी, कोटक महिंद्रा बँक, बजाज फिनसर्व्ह आणि अॅक्सिस बँक यांचे समभाग हे घसरणीसह बंद झाले.
तेजीची कारणे..
भारतीय बाजारात मोठी हिस्सेदारी प्राप्त करणाऱ्या कंपन्यांमध्ये टीसीएस आणि इन्फोसिस यासारख्या कंपन्यांचे समभाग हे तेजीत राहिले व विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या गुंतवणुकीच्या प्रभावामुळे बाजाराला मजबूत स्थिती प्राप्त करणे सोपे झाले.
जागतिक बाजारांची स्थिती
आशियातील बाजारांमध्ये चीनचा शांघाय आणि हाँगकाँगचा शेअर बाजार तेजीसह बंद झाला आहे. दक्षिण कोरिया आणि सियोल आणि टोकिओ घसरणीसह बंद झाला आहे. अधिकतर युरोपीय बाजार तेजीत राहिले होते. यासह विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात पैसे गुंतवले आहेत. याचाही लाभ भारतीय बाजारात झाला.