निकालानंतर चार महिन्यांनी गुणपत्रिका मिळणार
परीक्षा मंडळाच्या कारभाराबद्दल नाराजी
बेळगाव : एसएसएलसी परीक्षेचा निकाल जाहीर करून चार महिने उलटले तरी गुणपत्रिका देण्यात आल्या नसल्याने परीक्षा मंडळाच्या कार्यशैलीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यामुळे परीक्षा मंडळाने मंगळवारी गुणपत्रिका उपलब्ध करून देण्यात येतील, असे सांगितले. सोमवारी दुपारी बेळगावच्या जिल्हाशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून सर्व शाळांना नोटीस पाठविण्यात आली असून मंगळवारी गुणपत्रिकांचे वितरण केले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. एसएसएलसी परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर झाला. त्यानंतर एसएसएलसी परीक्षा-2 त्यानंतर परीक्षा-3 जुलै व ऑगस्ट महिन्यात घेण्यात आली. आता परीक्षा बोर्डाकडून एसएसएलसी व पीयुसीच्या पूर्व परीक्षांच्या वेळापत्रकाची तयारी करीत आहे. असे असताना एसएसएलसी परीक्षेचा निकाल जाहीर होऊन चार महिने उलटले तरी अद्याप विद्यार्थ्यांच्या हातात गुणपत्रिका उपलब्ध झालेल्या नाहीत.
निकाल जाहीर झाल्यानंतर परीक्षा मंडळाकडून ऑनलाईन गुणपत्रिका देण्यात आली होती. या गुणपत्रिकेच्याच आधारे विद्यार्थ्यांनी पीयुसीसाठी प्रवेश घेतला. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन परीक्षाही घेण्यात आल्या. पण गुणपत्रिका न मिळाल्याने विद्यार्थी व पालकांतून नाराजी व्यक्त होत होती. गुणपत्रिकेंच्या छपाईसाठी सप्टेंबर महिन्यात निविदा मागविण्यात आल्या. त्यानंतर गुणपत्रिकेंच्या छपाईचे काम सुरू झाले. उशिराने छपाई झाल्याने गुणपत्रिका उशिराने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे. काही अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी अधिकृत गुणपत्रक आवश्यक असते. विशेषत: इतर राज्यांमध्ये पुढील शिक्षण घेणाऱ्यांना मूळ गुणपत्रक गरजेचे असते. परंतु उशिरा छपाई झाल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना अनेक अडचणींच्या सामना करावा लागला. सर्व बाजूनी टीका झाल्यानंतर अखेर सोमवारी दुपारी गुणपत्रिकांचे वाटप केले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
कागदपत्रांची पडताळणी करूनच छपाई
गुणपत्रिका उशिरा देण्यात येणार आहेत. याबाबत शिक्षण विभागाला विचारले असता गुणपत्रिकांमध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत यासाठी उशिराने छपाई केले जाते. काहीवेळा गुणपत्रिकेत नावात बदल होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कागदपत्रांची पडताळणी करून त्यानंतरच छपाई केली जात असल्याने विलंब होत असल्याचे सांगण्यात आले.