For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बंडाचे निशाण...राजकारण्यांची शान?

06:30 AM Apr 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
बंडाचे निशाण   राजकारण्यांची शान
Advertisement

प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र व बसनगौडा पाटील यांच्यातील संघर्षात हायकमांडची चांगलीच कोंडी झाली होती. कोणावरही कारवाई केली तरी अडचणी शेवटी पक्षाच्याच वाढणार, हे स्पष्ट होते. सध्या त्याचीच चिन्हे दिसू लागली आहेत. भाजपमधील या घडामोडींमुळे काँग्रेसजन खुश असले तरी काँग्रेसमधील परिस्थितीही यापेक्षा काही वेगळी नाही.

Advertisement

माजी केंद्रीय मंत्री व विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांची भाजपमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात भाजपच्या हायकमांडने हा निर्णय जाहीर केल्यानंतर कर्नाटकातील राजकीय घडामोडी गतिमान झाल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र व बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष या कारवाईमुळे संपला आहे, अशी समजूत असेल तर ती गैर ठरणार आहे. हकालपट्टीच्या कारवाईनंतर बसनगौडा पक्षाच्या चौकटीतून मुक्त झाले आहेत. आता बी. एस. येडियुराप्पा व विजयेंद्र यांच्यावर टीका करण्यापासून त्यांना कोणीही अडवू शकत नाही. हकालपट्टीनंतर ते काम नव्या जोमाने करू लागले आहेत. येडियुराप्पा व त्यांच्या कुटुंबीयांच्या राजकारणाचा शेवट केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. नव्या दमाने, नव्या जोमाने प्रमुख हुद्द्यासह लवकरच पुन्हा आपण भाजपमध्ये येणार आहोत. त्यावेळी बघू, अशी तंबी बसनगौडा यांनी दिली आहे.

बसनगौडा पाटील-यत्नाळ यांची हकालपट्टी करतानाच विजयेंद्र समर्थक माजी मंत्री कट्टा सुब्रमण्यम नायडू, एम. पी. रेणुकाचार्य यांनाही नोटीस देण्यात आली आहे. याचाच अर्थ विजयेंद्र यांच्यासाठीही हायकमांडने दिलेला हा एक इशाराच आहे. यत्नाळ यांच्यावरील कारवाईनंतर आता विजयेंद्र हेच प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार की कर्नाटकात नेतृत्वबदल होणार? अशी चर्चा रंगली आहे. हकालपट्टीनंतर थोड्या दिवसांसाठी का होईना, यत्नाळ गप्प बसतील, अशी सगळ्यांची समजूत होती. ही समजूत खोटी ठरवत ते कामाला लागले आहेत. कर्नाटकातील प्रमुख लिंगायत पंचमसाली समाजाचे ते नेतृत्व करतात. समाजाचे पाठबळ त्यांना आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार नाही, अशीच सगळ्यांची समजूत होती. स्वत: बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनाही असेच वाटत होते. हायकमांडने कर्नाटकातील नेत्यांच्या सर्व समजुती खोट्या ठरवत त्यांच्यावर कारवाई केली आहे.

Advertisement

या कारवाईनंतर लिंगायत पंचमसाली समाज आक्रमक बनला आहे. 10 एप्रिलपर्यंत कारवाई रद्द करून बसनगौडा यांना सन्मानाने पुन्हा पक्षात घ्या. नहून 13 एप्रिल रोजी बेळगाव येथे राज्य पातळीवरील आंदोलन छेडण्यात येणार आहे. आपले हे आंदोलन पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. न•ा किंवा केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात नाही. बसनगौडा यांची पक्षातून हकालपट्टी करण्यासाठी ज्यांनी कुतंत्र केले, त्या येडियुराप्पा व त्यांचे चिरंजीव विजयेंद्र यांच्या विरोधात आहे, असे पंचमसाली समाजाचे जगद्गुरू बसव जयमृत्युंजय स्वामीजींनी सांगितले आहे. स्वामीजींची ही भूमिका भाजपमधीलच अनेक पंचमसाली नेत्यांना पटली नाही. बसनगौडा यांच्यावरील कारवाईच्या विरोधात भाजपमधील पंचमसाली आमदारांनी राजीनामा द्यावा, अशी हाक स्वामीजींनी दिली होती. त्याला साहजिकच आमदारांचा प्रतिसाद मिळाला नाही. कारवाईनंतर दोन दिवस ते थंड होते. बेंगळूर येथे असंतुष्टांची बैठक झाली. या बैठकीसाठी बसनगौडा बेंगळूरला आले होते. या बैठकीच्या माध्यमातून आम्ही सगळे एक आहोत, असा संदेशच या नेत्यांनी हायकमांडलाही दिला आहे.

माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी बसनगौडा पाटील-यत्नाळ हे पक्षाचे प्रामाणिक नेते आहेत. त्यांच्यावरील कारवाई दुर्दैवी आहे असे सांगतानाच त्यांना पुन्हा पक्षात घ्यावे, अशी विनंती केली आहे. स्वत: बी. एस. येडियुराप्पा हेही भाजपमधून बाहेर पडले होते. पक्षाने पुन्हा त्यांना घेतलेच. असे अनेक नेत्यांबाबत घडले आहे. त्यामुळे यत्नाळही पक्षात परततील, असे बहुतेक नेत्यांना वाटते. हकालपट्टीच्या कारवाईनंतरही राजकारणातील घराणेशाही, सत्ताधारी नेत्यांशी केलेली हातमिळवणी आदींवर यत्नाळ यांची टीका सुरूच आहे. अलीकडे हिंदुत्वाचे फायरब्रँड नेतृत्व अशी त्यांची ओळख तयार झाली होती. ती ओळख कायम ठेवण्यासाठी हिंदुत्वाचे रक्षण करणारा पक्ष स्थापन करण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. यासाठी ते राज्याचा दौरा करू लागले आहेत. विजयादशमीपर्यंत आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. जर तोपर्यंत परिस्थितीत बदल होऊन पक्षाने त्यांना पुन्हा प्रवेश दिला तर नव्या पक्षाचा संकल्प ते तडीस नेणार नाहीत. नहून नव्या पक्षासाठी त्यांनी धडपड सुरू केली आहे. साहजिकच त्याचा राजकीय फटका भाजपलाच बसणार आहे. विजयेंद्र व बसनगौडा पाटील यांच्यातील संघर्षात हायकमांडची चांगलीच कोंडी झाली होती. कोणावरही कारवाई केली तरी अडचणी शेवटी पक्षाच्याच वाढणार, हे स्पष्ट होते. सध्या त्याचीच चिन्हे दिसू लागली आहेत. भाजपमधील या घडामोडींमुळे काँग्रेसजन खुश असले तरी काँग्रेसमधील परिस्थितीही यापेक्षा काही वेगळी नाही.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार समर्थकांमधील संघर्ष सुरूच आहे. मुख्यमंत्री हायकमांडच्या भेटीसाठी दिल्लीला गेले आहेत. ऑक्टोबरपर्यंत ठरल्याप्रमाणे डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद मिळाले नाही तर काँग्रेसमधील संघर्ष आणखी तीव्र होणार आहे. पूर्ण संख्याबळाने सत्तेवर येऊनही शांतपणे सत्ता चालवता येईना, अशी त्या पक्षातील नेत्यांची अवस्था झाली आहे. वाढत्या सत्तासंघर्षामुळेच हनिट्रॅप, राजकीय नेत्यांच्या खुनासाठी सुपारी देण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. या प्रकारांचीही चौकशी करण्यात येत आहे. कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस, प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप व त्यांचा राजकीय भागीदार असणारा निजद या तिन्ही पक्षातील संघर्ष वाढतो आहे. माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी हे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर पक्षाची जबाबदारी किंवा विधानसभेतील नेतृत्व आपल्याकडे येणार, या आशेने बसलेले जी. टी. देवेगौडा यांचा भ्रमनिरास झाला आहे. देवेगौडा कुटुंबीय सत्ता आपल्या कुटुंबाबाहेर देताना अनेकवेळा विचार करतात. शक्यतो सत्तासूत्रे आपल्याच हाती रहावीत, आपल्याच घरी रहावीत, यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे साहजिकच दुसऱ्या फळीचे नेतृत्व नाराज होते. कर्नाटकातील तीनही राजकीय पक्षांमधील अस्वस्थता वाढत चालली आहे.

Advertisement
Tags :

.