गुहेत राहणारा माणूस...
कुशिरे पोहाळे जवळच्या बौद्धकालीन गुंफांतील सुरक्षा रक्षकाची अनोखी सेवा
कोल्हापूरः सुधाकर काशीद
गुहेत राहायचे दिवस संपले आहेत, असे आपण म्हणतो. पण कोल्हापूरपासून अवघ्या 15 ते 16 किलोमीटर अंतरावर एक माणूस आजही दिवसभर गुहेतच राहतो. अर्थात तो काही आदिमानव नाही. सुधारलेल्या जगापासून खूप लांब आहे, असेही काही नाही. पण तो सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत गुहेतच असतो आणि केंद्रीय पुरातत्त्व खात्याची जबाबदारीची सेवा म्हणून अगदी बारा महिने ती पार पाडतो.
कोल्हापूर-वडणगे-निगवेमार्गे सादळे-मादळे डोंगरातून ज्योतिबा डोंगराकडे निघाले की कुशिरे-पोहाळेच्या पुढे डाव्या हाताला एक छोटी पायवाट जाते. त्यावरून दहा-पंधरा मिनिटे चालत उतारावरून खाली गेले की आपण एका डोंगराच्या पायथ्याला पोखरून तयार केलेल्या दगडी गुहांच्या रांगेसमोरच येतो. हा अनोखा शिल्प आविष्कार पाहून ‘अरे काय हे’ असाच शब्द प्रत्येकाच्या तोंडातून आपोआप बाहेर पडतो.
गुहा म्हणून या परिसराची स्थानिक ओळख असली तरी या गुहा म्हणजे बौद्धकालीन प्राचीन गुंफा आहेत. कोल्हापूरचा इतिहास किती प्राचीन आहे आणि तो कसा दडून राहिला आहे, त्याचे हे उदाहरण आहे. या गुहा कोल्हापूरच्या बौद्ध संस्कृतीची साक्ष आहेत. वरती डोंगर व पायथ्याला तो डोंगर पोखरून त्या गुंफांना आकार देण्यात आला आहे. व्हरांडा, दगडी खांबावर पेललेला हॉल, निवारा कक्ष, चैत्यगृह, पाण्याच्या चौकोनी टाक्या, असे त्याचे खोदीव स्वरूप आहे. भारतीय पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत हा सारा परिसर आहे. एखाद्या वास्तूला शंभर वर्षे पूर्ण झाली की, आपण त्याचे खास कौतुक करतो. पण या गुंफा 1500 ते 2000 वर्षांपूर्वीच्या आहेत. पाहण्यायोग्य आहेत. फार वाकडी वाट करावी न लागता निगवे- ज्योतिबा मार्गावर आहेत. पर्यटकांनी तर आवर्जून भेट द्यावी, असा हा सारा परिसर आहे.
अशा गुहांच्या दैनंदिन देखभालीसाठी एक व्यक्ती आहे. उत्तम गुरव असे त्यांचे नाव आहे. रोज सकाळी 8 वाजता ते येतात. परिसरात पडलेला झाडांचा पाला काड्या, कपटे झाडून काढतात. गुहांच्या आतल्या भागाची स्वच्छता करतात.डोंगरातून झिरपणाऱ्या थेंबामुळे रात्रभर साचलेले पाणी पुसून काढतात आणि गुहेच्या दर्शनी भागात दिवसभर बसून राहतात. काही अंतरावरूनच ज्योतिबाकडे जाणारा रस्ता जातो. वाहनांची ये-जा सतत असते, पण या गुहेची रचना अशी की, त्याचा आवाज या गुहेपर्यंत पोहोचत नाही. काही पर्यटक येतात, त्यांना या गुहांचा काळ, प्राचीन महत्त्व, याची माहिती कळण्यासाठी तेथे कोणताही बोर्ड नाही. त्यामुळे दंतकथाच अधिक पसरल्या जातात. पर्यटक म्हणून आलेले काहीजण अतीहौशी गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करतात. पण उत्तम गुरव एकटे धाडसाने तो प्रकार रोखतात. प्रसंगी लोखंडी जाळीला कुलूप लावून बाहेरूनच गुहा पाहायची विनंती अशा हौशी पर्यटकांना करतात. अर्थात तेथे 24 तास पर्यटकांची अजिबात गर्दी नसते. त्यामुळे या गुहांच्या जवळ फक्त आणि फक्त निवांत शांतता असते. रानपक्ष्यांच्या आवाजाची या शांततेला मंद अशी संगीताची किनार दिवस मावळेपर्यत असते. वाऱ्याची लय व डोंगरातून झिरपणाऱ्या टीप..टीप.. पाण्याच्या थेंबांचीही लय या ठिकाणी स्पष्ट ऐकू येते.
या ठिकाणी फक्त उत्तम गुरव यांचेच दिवसातले दहा तास अस्तित्व असते. तुफान पावसातही त्यांना ड्युटी करावी लागते. ड्युटीवर हजर झाल्याचा पुरावा म्हणून सेल्फी काढून त्यांना ती वरिष्ठ कार्यालयात पाठवावी लागते. दहा तासातील आठ तास केवळ नि:शब्द अशी शांतता त्यांच्या वाट्याला येते. गुहेजवळ कधी मोरांचा थवा येतो, कधी पारव्यांचा थवा येतो. सापांची ये-जा तर नित्याची असते. विजांचा, ढगाचा, कडकडाट सुरू झाला की, माकडे पोटाशी पिल्लाला धरून सुरक्षिततेसाठी गुहेकडे कशी धाव घेतात, हे त्यांना पाहता येते. लांबून चाललेल्या गव्यांच्या कळपाचे हमखास दर्शन होते. गुहेच्या एका कट्ट्यावर बसून त्यांना हे सारे पाहता येते. एखादा पर्यटक आला तरच बोलायची संधी मिळते. नाही तर फक्त मौन आणि मौनच... उत्तम गुरव यांच्या वाट्याला या गुहेत येते.
या ठिकाणी जायचे असेल तर कोल्हापूर वडणगे, निगवे, कुशिरे, पोहाळे मार्गे जाता येते. या गुहा कोठे आहेत, याची नेमकी दिशा दर्शवणारा फलक या ठिकाणी नाही. त्यामुळे गुहा शोधणे कठीण जाते. पण स्थानिक लोक गुहेची जागा व्यवस्थित सांगतात. त्यामुळे त्या ठिकाणी जाता येते. या गुहांचे महत्व एवढे आहे की परदेशी अभ्यासकही या ठिकाणी भेट देतात.