ममता बॅनर्जी-ईडी वाद न्यायालयात
दोघांच्याही एकमेकांच्या विरोधात याचिका सादर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
प्रवर्तन निदेशालय (ईडी) आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यात भडकलेला वाद आता कलकत्ता उच्च न्यायालयात पोहचला आहे. दोन्ही बाजूंकडून एकमेकींच्या विरोधात याचिका सादर करण्यात आल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी आमच्या कामात बेकायदेशीर पद्धतीने अडथळा आणून महत्वाच्या पुरावा हिसकावून घेतला आहे, असे ईडीचे म्हणणे आहे. तर ईडीने आमच्या विरोधात सूडबुद्धीने धाडी घातल्या आहेत, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार प्रतीक जैन यांच्या घरावर गुरुवारी कोळसा घोटाळ्याच्या संदर्भात ईडीने धाडी घातल्या होत्या. ईडीचे अधिकारी त्यांचे काम करीत असताना ममता बॅनर्जी पोलीसांसह तिथे पोहचल्या. त्यांच्या आधी काही काळ पश्चिम बंगालचे पोलिस महासंचालक तेथे पोहचले होते. त्यांच्यापाठोपाठ ममता बॅनर्जी स्वत:चे तेथे पोहचल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. ममता बॅनर्जी यानी प्रतीक जैन यांच्या घरातून कोळसा घोटाळ्याच्या संबंधातल्या फायली, संगणक हार्डडिस्कस् आणि इलेक्ट्रॉनिक साधने हिसकावून घेतली आणि त्या निघून गेल्या अशा ईडीचा आरोप आहे. ईडीने शुक्रवारीच कलकत्ता उच्च न्यायालयात यासंबंधी याचिका सादर केली आहे. शनिवारी ममता बॅनर्जी यांनीही ईडीच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे दिसून आले.
शाह यांच्या घरावर मोर्चा
प्रतीक जैन यांच्या घरावर धाड घातल्याच्या निषेधार्थ तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी आणि कार्यकर्त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानावर शुक्रवारी मोर्चा काढला होता. शाह हे ईडीचा दुरुपयोग करुन ममता बॅनर्जी यांना त्रास देत आहेत, असा आरोप त्यांनी केला. पोलिसांनी वेळीच कारवाई करुन ही निदर्शने मोडून काढल्याचे दिसून आले. स्वत: ममता बॅनर्जी यांनीही कोलकाता येथे ईडीच्या निषेधार्ह जनमोर्चाचे आयोजन शुक्रवारी केले होते.
प्रतीक जैन यांचीही याचिका
ममता बॅनर्जी यांचे सल्लागार प्रतीक जैन यांनीही ईडीविरोधात कलकत्ता उच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. या सर्व याचिकांवर लवकरच उच्च न्यायालात एकत्रित सुनावणी केली जाणार आहे. ममता बॅनर्जी यांनी महत्वाचा पुरावा पळवला असून हार्डडिस्कस्मधी इलेक्ट्रॉनिक पुरावा नष्ट केला तर तो पुन्हा मिळविता येणे कठीण होईल. त्यामुळे कोळसा घोटाळ्यातील पुरावा कमजोर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर करावी, अशी मागणी ईडीने उच्च न्यायालयात केली आहे. बॅनर्जी यांनी याला विरोध केला आहे. बॅनर्जी आणि त्यांचे पोलिस यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना काही काळ स्थानबद्ध ठेवले होते आणि त्यांना त्यांचे काम करण्यास अटकाव केला होता, असा आरोपही ईडीच्या याचिकेत करण्यात आला आहे. बॅनर्जी यांनी हिसकावलेला इलेक्टानिक पुरवा लवकरात लवकर ईडीच्या हाती पडला पाहिजे. अन्यथा तो नष्ट केला जाण्याची शक्यता आहे, असा युक्तीवाद ईडीच्या वतीने शुक्रवारी कलकत्ता उच्च न्यायालयात केला. तर ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या याचिकेत सीबीआय सूड उगविण्याच्या हेतूने कारवाई करीत आहे आमची निवडणूक विषयक कागदपत्रे सीबीआयने चोरली आहेत, असा आरोप बॅनर्जींनी केला आहे. मात्र, ईडीने हा आरोप नाकारला असून सदर धाडींचा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही. मात्र पश्चिम बंगालमध्ये काही वर्षांपूर्वी झालेल्या महाप्रचंड कोळसा घोटाळ्याच्या संदर्भातील आहे, असे स्पष्टीकरण ईडीने आपल्या प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केले आहे.