‘सुपर एल निनो’चा मुकाबला करण्याचे मोठे आव्हान
सुपर एल निनोच्या परिणामामुळे यावेळी भारतातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. आता शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की, यंदाच्या ‘सुपर एल निनो’मुळे जगभरात निर्माण झालेल्या तीव्र उष्णतेमुळे पुढील वर्षापर्यंत सुमारे साडेचार लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो. सप्टेंबर ते फेब्रुवारी दरम्यान मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या या सुपर एल निनोमुळे निर्माण होणाऱ्या अति तापमानामुळे भारतात खूप नुकसान होऊ शकते.
सुपर एल निनोच्या आपत्तीसाठी काटेकोर नियोजन आणि प्रभावी व्यवस्थापन राबवल्यास मनुष्यहानी वित्तहानी प्रभावीपणे कमी करता येऊ शकेल. जागतिक संशोधन संस्था क्लायमेट इम्पॅक्ट लॅबने नुकताच हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, एल निनोमुळे दुष्काळ, काही भागांमध्ये पूर आणि जंगलातील आगींच्या घटनांमध्ये वाढ होईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होण्याची शक्यता आहे. सुमारे 200 पर्यावरणशास्त्रज्ञांनी अन्य संशोधक आणि प्रायोगिक काम करणाऱ्यांना आवाहन केलेय की, येणाऱ्या सुपर एल निनोमुळे वन्यजीव आणि परिसंस्थांवर होऊ शकणाऱ्या ‘विनाशकारी’ परिणामांची तयारी करावी. सध्या सुपर एल निनोमुळे पृथ्वीचे तापमान सातत्याने वाढत आहे. युरोपसह अनेक भागांमध्ये यंदा उष्णतेची तीव्रता इतकी वाढली आहे की, शास्त्रज्ञ तिला ‘गॉडझिला लेव्हल’ अशी उपमा देत आहेत.
सुपर एल निनो हा एक गुंतागुंतीच्या हवामान घटनेच्या तीन टप्प्यांपैकी एक आहे, ज्याला एल निनो साउदर्न ऑस्सिलेशन असे म्हणतात, आणि हे ट्रॉपिकल पॅसिफिक समुद्र पृष्ठभागाच्या तापमानातील चढ-उतार व हवामानातील बदलांमुळे होते. जेव्हा ट्रॉपिकल पॅसिफिक महासागर गरम होतो, तेव्हा एल निनो होते, आणि याचा संबंध अनेक प्रदेशांमध्ये कमजोर मान्सून व कमी पावसाशी असतो, ज्यामध्ये दक्षिण आशिया आणि भारताचा मोठा भाग यांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, भारतात मान्सूनमध्ये होणाऱ्या दुष्काळांपैकी जवळजवळ अर्धा एल निनोशी संबंधित असतो. एल निनो जगभरात आधीच सुरू झाला आहे, आणि भारतातही तसेच आहे. हवामान शास्त्रज्ञ रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी जुलै महिन्यात सांगितले होते की, या एल निनोच्या सुरूवातीस आपल्याला मानव इतिहासातील नोंदवलेल्या सर्वात गरम वर्षांपैकी एक वर्ष पाहायला मिळू शकते. जागतिक हवामान संघटना यांनी या वर्षी जुलैमध्ये इशारा दिला होता की, एक ‘जोरदार’ एल निनो विकसित होत आहे. ऑगस्ट-ऑक्टोबर 2026 दरम्यान तो अधिक ताकदवान होईल अशी अपेक्षा आहे. सप्टेंबरच्या पहिल्या सप्ताहात जागतिक हवामान संघटनेने जाहीर केले की एल निनो ‘ठामपणे प्रस्थापित’ झाला आहे व आगामी महिन्यात तो ‘खूपच जोरदार घटना’ म्हणून तीव्र होईल म्हणजेच ‘सुपर एल निनो सक्रिय झाला असून, तो पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत सुरु राहील.’ या सुपर एल निनोचा पर्जन्यमान व तापमानाच्या पॅटर्नवर मोठा परिणाम होईल तसेच पूर, दुष्काळ व अत्यंत उष्णतेची जोखीमदेखील राहील असा इशारा देण्यात आला आहे. शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की, सुपर एल निनोच्या परिणामामुळे येत्या काही महिन्यांत जगभरातील जमिनीच्या तापमानात 1.2 अंश सेल्सियसपर्यंत वाढ होऊ शकते. सुपर एल निनोची सुरुवात जून महिन्यापासून झाली असून त्यामुळंच असामान्य उष्णता निर्माण झाली आहे. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, वाढत्या तापमानाशी जुळवून घेण्यासाठी माणसाला पुरेसा वेळ मिळण्याआधीच तापमानात मोठी वाढ होऊ शकते. प्रचंड वाढलेल्या तापमानाचा त्रास सहन कराव्या लागणाऱ्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. क्लायमेट इम्पॅक्ट लॅबच्या अहवालानुसार, उष्णतेमुळं सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा चौथा क्रमांक लागतो. या यादीत भारताच्या पुढं नायजेरिया, इंडोनेशिया आणि सुदान यांचा समावेश आहे. याशिवाय ब्राझील, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, नायजर, चाड, फिलिपिन्स आणि दक्षिण सुदानमध्येही उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या जास्त असेल अशी शक्यता आहे.
सुपर एल निनोच्या परिणामांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन तंत्रांचा योग्य वापर करावा लागेल. राष्ट्रीय, राज्य आणि शहरांतील सरकार आणि प्रशासनांना प्रभावी उपाययोजनांवर काम करावं लागेल. दुष्काळाची झळ मोठ्या लोकसंख्येला बसणार आहे. त्यासाठी पूर्व तयारी असावी लागणार आहे. तसेच आरोग्यविषयक सूचना देणे, दुर्बल घटकांना आरोग्य सुविधा पुरवणे, शीतकरण केंद्रं आणि पाणीपुरवठा केंद्रं उभारणे व कामगारांचं संरक्षण करणं यांसारख्या उपायांवर मायक्रो मॅनेजमेंट करणे गरजेचे. लोकांसाठी पाण्याच्या सुविधा वाढवणे, तापमानाबाबत लवकर आणि अचूक सूचना देणे इत्यादी उपाययोजनांवर भर देण्यात यायला हवा. ज्या ज्या वेळी भारतात दुष्काळ पडला आहे, त्यातल्या बहुतांश वेळी वातावरणात एल निनो सक्रिय असल्याचं समोर आलं आहे. 1871 नंतर भारतात पडलेल्या दुष्काळांपैकी 6 दुष्काळ हे एल निनोचे दुष्काळ आहेत. ज्यात अलीकडील 2002 व 2009 मधील दुष्काळांचा समावेश आहे. आता भारताने वाढत्या तापमानाला सार्वजनिक आरोग्य आणि व्यावसायिक व कामगार हक्कांचे संकट म्हणून पाहायला सुरुवात करायला हवी. हा ‘सुपर एल निनो येत्या काही महिन्यांत “संभाव्य प्रतिकूल परिणाम” घडवू शकतो, यात प्राणी-वनस्पतींच्या शारीरिक रचना आणि वर्तन आणि उक्रांती, लोकसंख्या गती यांसारख्या गोष्टीत बदल होऊ शकतात.
प्रा. डॉ. गिरीश नाईक