धनगरी ढोलवरील गजनृत्य मिरवणुकीचे मुख्य आकर्षण
कोल्हापूर :
धनगरी ढोलांच्या तालावरील गजनृत्याने मंगळवारी शहरात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. निमित्त होते सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूक. या मिरवणुकीचे उद्घाटन माजी महापौर रामभाऊ फाळके यांच्या हस्ते झाले. तर अध्यक्षस्थानी माधवभाऊ गडदे होते.
या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण धनगरी ढोल व गजनृत्य ठरले. महिलांनी लेझिम खेळत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. धनगरी ओव्या गात अनेक प्रश्नांवर प्रकाश टाकला. तर यशवंतराव होळकर यांच्या कार्याचा आढावा ओव्यातून घेण्यात आला. चित्ररथामध्ये यशवंतराव होळकर यांचा भव्य पुतळा होता. अनेक धनगरी बांधवांनी विविध वेशभूषा केली होती. यामध्ये यशवंतराव होळकर यांची वेषभूषा प्रसाद तासे यांनी तर मल्हारराव होळकर यांची वेशभूषा एन. डी. चौगुले यांनी केली होती. अहिल्यादेवी होळकर यांच्या वेशभूषेत श्वेता सुतार होत्या. तर अक्षय कदम, संजय पटवर्धन हे दोन मावळ्यांच्या वेशभूषेत होते. दसरा चौक, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी, महानगरपालिका, सीपीआरमार्गे पुन्हा दसरा चौकात येऊन मिरवणुकीची सांगता करण्यात आली. चित्ररथाच्या माध्यमातून सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार केला. भंडाऱ्याची उथळण आणि धनगरी ढोलांच्या तालावर मिरवणूक पुढे सरकत होती. यशवंतराव होळकर यांच्या जयघोषाने मिरवणूक परिसर दणदणून गेला होता. पुरुषांनी पिवळी टोपी, पिवळा फेटा, गळ्यात पिवळे उपरणे, खांद्यावर घोंगडे परिधान केले होते. महिलांनी पिवळ्या साड्या परिधान करून कपाळाला भंडारा लावला होता. भंडाऱ्याची उधळण केल्याने अखंड परिसर पिवळा झाला होता.
यावेळी राजेश तांबवे, डॉ. संदीप हजारे, संजय काळे, अमोल पांढरे, महिलाध्यक्ष ललिता पुजारी, बापू शिरोले, बबनराव रानगे, राघू हजारे यांच्यासह धनगर बांधव व भगिणी मोठ्या प्रमाणात मिरवणुकीत सहभागी झाले होते.