महायुतीने राज्याचा लौकिक घालवला
सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी : निर्भय बनो सभेत केंद्र-राज्य सरकारवर हल्लाबोल
कोल्हापूर :
राज्यातील सरकारची ओळख देशभर खोक्याचे सरकार अशीच झाली आहे. त्यांनी जनतेच्या हिताचे एकही काम अथवा कायदा केलेले नाही. या उलट त्यांच्या कारकिर्दीत भ्रष्ट कारभारच झाला आहे. त्यांनी भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मोडले असल्याचा खळबळजणक आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी केले. शाहू स्मारक भवन येथे आम्ही भारतीय लोक आंदोलनच्या वतीने सोमवारी आयोजित निर्भय बनो सभेत ते बोलत होते. सरोज (माई) पाटील अध्यक्षस्थानी होत्या.
चौधरी म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचा सरकारला महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेशमध्ये दारून पराभव झाला आहे. या दोन राज्यांनी लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. तरीही त्यांनी बोध घेतलेला दिसत नाही. महिलांचा अपमान केला जात आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी केलेले विधान निषेधार्ह आहे. त्यांनी काँग्रेसच्या सभेत येणाऱ्या महिलांचा फोटो काढण्याचे आवाहन केले आहे. त्यांनाच येथून पुढे स्वत:च्या चेहऱ्याचा फोटो काढता येणार नाही, अशी परिस्थिती विधानसभेच्या निवडणुकीत करा. ही लढाई सत्ता परिवर्तनाची नसून उद्याचा महाराष्ट्र घडविण्याची आहे.
केंद्र सरकारने महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात कारण नसताना ईडी लावली. शासन, प्रशासना ही गोष्टच त्यांनी शिल्लक ठेवली नाही. एन्काऊंटर कायद्याने गुन्हा आहे. असे असतानही बदलापूर येथे एन्काऊंटर केले गेले. याची पोस्टर्स लागली. हत्येचे भांडवल केले. मात्र, मुख्य गुन्हेगारांचे काय झाले, हे अद्यापी समोर आलेले नाही. देशातील सुरक्षा व्यवस्था बिघडली आहे. यावर भाष्य केले तर राजकारण करू नका, असे ठणकावले जात आहे. बटेंगे तो कटेंगे असे म्हटले जात आहे. वास्तवात त्यांच्याकडूनच समाजात तेढ निर्माण केला जात आहे.
सरोज पाटील म्हणाल्या, पुरोगामी महाराष्ट्र असून तसाच राहिला पाहिजे. जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना विधानसभेच्या निवडणुकीत धडा शिकविला पाहिजे. काही अपप्रवृत्तीकडून युवक-युवतींची माथे भडकविण्याचे काम सुरू आहेत. अशापासून मुलांना वाचविण्याची गरज असून पालकांचे मुलांवर लक्ष ठेवले पाहिजे.
अॅड. असीम सरोदे म्हणाले, महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही, खासदार महाडिकांवर अदखल नव्हे दखलपात्रच गुन्हा दाखल झाला पाहिजे. पोलिसांनी आतापर्यंत त्यांना कारणे दाखवा नोटीस का बजावलेली नाही. यामुळेच आम्ही अस्वच्छ चारित्र्याची सफाई करण्यासाठी स्वच्छता अभियान सुरू केले आहे. मोदी व शहा यांचे केवळ जमिनीवर प्रेम आहे. त्यांना जनतेचा काही देणे-घेणे नाही. जोपर्यंत विषमता संपत नाही तोपर्यंत देशातील आरक्षण कोणीही रद्द करू शकत नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला असल्याचे केंद्र सरकार म्हणत आहे. परंतू 14 हजार मराठी शाळा बंद आहेत. याचा कधी विचार करणार आहे. पेंद्रातील सरकार कुबड्या घेतलेले सरकार असून लवकरच पडणार आहे.
दाजी टॅक्स भरणार आणि बहिणीला 1500 देणार
लाडकी बहीण योजनेसह अन्य योजनांमुळे राज्याची तिजोरी रिकामी झाली आहे. लाडकी नाही तर धाडसी बहीण योजना आणावी. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी बिनव्याजी 50 हजार कर्ज द्यावे. टॅक्स दाजी भरणार आणि बहिणकडून 1500 घेणार असेही सवाल उपस्थित होत असल्याचे डॉ. चौधरी यांनी निदर्शनास आणले. तसेच शेतकरी आत्महात्या करत आहेत. त्यांच्यासाठी सरकारकडून कोणतेच हिताचे निर्णय होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.