‘महाकुंभ’ची चर्चा जगभर होईल!
पंतप्रधान मोदींचा दावा : 5,500 कोटी रुपयांच्या प्रकल्प-योजनांचे प्रयागराजमध्ये लोकार्पण
वृत्तसंस्था/ प्रयागराज
‘महाकुंभ मेळा 2025’ च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे दाखल झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘संगमनगरी’ प्रयागराज शहरासाठी 5,500 कोटी रुपयांच्या योजनांचे लोकार्पण केले. याप्रसंगी हा सोहळा भव्यदिव्य होणार असून या महाकुंभ सोहळ्याची जगभर चर्चा होईल, असा दावा पंतप्रधानांनी केला. महाकुंभ हा एकतेचा इतका मोठा यज्ञ असेल, ज्याची संपूर्ण जगात चर्चा होईल. या कार्यक्रमाच्या भव्य आणि दिव्य यशासाठी मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो, असे प्रतिपादनही पंतप्रधानांनी केले
महाकुंभाबाबत राज्य सरकारने अनेक प्रकल्प पूर्ण केले आहेत. प्रयागराजमध्ये महाकुंभाच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी जाहीर सभेला संबोधित केले. जगात प्रथमच एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला जात असल्याचे मोदी म्हणाले. 45 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात दररोज लाखो भाविकांचे स्वागत आणि सेवा करण्याची तयारी सुरू आहे. सलग 45 दिवस चालणारा हा महायज्ञ आहे. प्रयागराजच्या या भूमीवर नवीन शहर स्थापनेच्या महामोहिमेतून एक नवा इतिहास रचला जात असल्याचे प्रतिपादनही पंतप्रधानांनी केले. या ऐतिहासिक कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक आणि मुख्य सचिव मनोज कुमार सिंह यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आपला भारत हा पवित्र स्थळे आणि तीर्थक्षेत्रांचा देश आहे. गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, नर्मदा अशा असंख्य पवित्र नद्यांचा देश आहे. या नद्यांच्या प्रवाहाचे पावित्र्य, या असंख्य तीर्थक्षेत्रांचे महत्त्व आणि महानता, त्यांचा संगम, संयोजन, प्रभाव, वैभव म्हणजेच हा ‘प्रयाग’ असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. येथे केवळ तीन नद्यांचा संगम नसून प्रयागराजमधील प्रत्येक पायरीवर पवित्रता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रयागराजमध्ये आज लोकार्पण करण्यात आलेल्या योजना प्रकल्पांच्या माध्यमातून शहराला भव्य-दिव्य साज चढणार असून आता हे तेज कायम टिकून राहील, असेही ते पुढे म्हणाले.
कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक
पंतप्रधान मोदींनी महाकुंभ आयोजित करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कामाचेही कौतुक केले. ते म्हणाले की प्रयागराजमधील संगमच्या या पवित्र भूमीला मी आदरांजली अर्पण करतो. महाकुंभला उपस्थित असलेल्या सर्व संत आणि ऋषींनाही मी नमस्कार करतो. महाकुंभ यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या कर्मचारी, मजूर आणि सफाई कामगारांचे मी विशेष अभिनंदन करतो, असेही पंतप्रधान म्हणाले.
वैदिक मंत्रोच्चारात सोहळा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तीर्थराज प्रयागराजच्या पवित्र भूमीवरील त्रिवेणी संगमावर प्रार्थना करत 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या महाकुंभाच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधान मोदींनी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या त्रिवेणीची आरती करून जागतिक कल्याणाची प्रतिज्ञाही केली. संपूर्ण कार्यक्रम भाविक-पुजाऱ्यांनी वैदिक मंत्रोच्चारात पार पाडला. यावेळी पंतप्रधानांनी त्रिवेणीमध्ये अक्षता, चंदन, रोळी, फुले आणि वस्त्र अर्पण केले. तत्पूर्वी पंतप्रधान मोदींनी प्रमुख ऋषी-मुनींचे आशीर्वादही घेतले. यावेळी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री योगी आणि राज्यपाल आनंदीबेन पटेलही उपस्थित होते.
निषादराज क्रूझमधून संगम तटावर दाखल
निषादराज क्रूझवर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी संगम तटावर पोहोचले. किला घाटातील तरंगत्या जेटीमार्गे ते क्रूझमध्ये चढले. पांढरा कुर्ता-पायजमा, निळे जॅकेट आणि मरून रंगाची शाल परिधान केलेले पंतप्रधान मोदी क्रूझवर चढल्यानंतर डेकवर उभे राहिले आणि यमुनेच्या लाटांकडे पाहत पुढे निघाले. याप्रसंगी ते संपूर्ण परिसराचे निरीक्षण करताना दिसत होते. यानंतर आम्ही रिव्हर क्रूझचाही आनंद लुटला. संगम तटावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनी त्यांचे पुन्हा एकदा स्वागत केले. यानंतर संतांची भेट घेऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी एका संताने त्यांना मोत्यांची माळही प्रदान केली.