मगो पक्ष आता केवळ एका घराण्याचा
मंत्री गोविंद गावडेंचा ढवळीकरांवर हल्लाबोल
पणजी : सध्याचा मगो पक्ष म्हणजे ‘फॅमिली राज’ असून तो फक्त एकाच कुटुंबापुरता मर्यादित आहे. हा पक्ष आता भाऊसाहेब बांदोडकरांचा राहिलेला नसून तो माधवरावांच्या गोठ्यातला पक्ष झालेला आहे. तो जर भाऊसाहेबांचा असेल तर मगो पक्षाच्या अध्यक्षपदी आमदार जीत आरोलकर किंवा बहुजन समाजाच्या नेत्याला अध्यक्ष करावे, असे आव्हान कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी मगो पक्षाला दिले आहे. भाजपला मगोबरोबर युती करण्याची गरज नसून पक्षाने आदेश दिल्यास फोंडा तालुक्याची जबाबदारी स्विकारण्याची तयारी गावडे यांनी दर्शवली आहे.
गावडे यांनी मगो संदर्भात बोलताना थेट मगो पक्ष आणि त्याचे नेते ढवळीकरांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, भाऊसाहेबांचा मगो पक्ष आणि सध्याचा मगो पक्ष यात खूप मोठा फरक झाला आहे. मगोपमधून निवडून येऊन अनेक बहुजन नेत्यांनी मगोपला सोडचिट्टी दिली. त्यात काशिनाथ जल्मी, लवू मामलेदार, नरेश सावळ, बाबू आजगांवकर, दीपक पावसकर यांचा समावेश असल्याचे गावडे यांनी निदर्शनास आणले. त्यांनी मगो पक्ष का सोडला याचा त्या पक्षाने कधी विचारच केला नाही. भाऊंचा मगो पक्ष हा तळागाळातील जनतेचा बहुजन समाजाचा होता तसा तो आता नाही असा ठपका गावडे यांनी ठेवला आहे.
मगोचे काहीजण काँग्रेसचे एजंट
मगोसोबत युती नको असे आपले पक्के मत असून ते 2012 पासून आपण मांडत आल्याचा दावा गावडे यांनी केला. सध्याच्या नेतृत्त्वाने मगो पक्ष वाढवलाच नाही तर तो फक्त दावणीला बांधला आहे. आपण पूर्वी मगोसाठी काम केले होते. मगोचे काहीजण काँग्रेसचे एजंट होते, अशी टीका गावडे यांनी केली. शिरोडा, फोंडा, प्रियोळ व मडकईत काम केले आहे. संपूर्ण फोंडा तालुक्याची जबाबदारी आपणाकडे दिल्यास आपण ती घेतो असेही गावडे यांनी स्पष्ट केले.
मंत्रिपद मिळाले फक्त ढवळीकरांनाच
वर्ष 1999 मध्ये मगोचेच काहीजण काँग्रेसचा प्रचार करून मते मागत होते. मगोतील जे लोक माझ्यावर टीका करतात त्यांना राजकारणात आपण आणले हे ते विसरतात. मगो पक्ष आता फक्त एका कुटुंबापुरता मर्यादित आहे. ढवळीकर सोडून मगोच्या एकाही आमदारास मंत्रीपद मिळाले नाही वा दिले नाही. मगोच्या लोकांना टक्केवारी पाहिजे. त्यांना पक्षाचे सोयरसुतक नाही, अशी टीकाही गावडे यांनी केली.