मगो-भाजपा युती अतुट राहणार
जागा वाटप निवडणूक सर्वेक्षणावर ठरणार : मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांची माहिती
फोंडा : मगो व भाजपाची युती कायम असून येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपर्यंत ती कायम राहणार आहे.भाजपाच्या केंद्रीय नेत्यांशी याबाबत झालेल्या बोलणीनंतर युतीसंबंधी जो संभ्रम निर्माण करण्यात आला, तो दूर झाला आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी व जागा वाटपाबाबतचा निर्णय निवडणूकपूर्व सर्वेक्षणानंतरच घेतला जाईल. तूर्त मगो पक्ष आपला प्रभाव असलेल्या मतदारसंघामध्ये कार्य सुऊच ठेवणार आहे, असे मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी प्रियोळ मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात युती संदर्भात केलेल्या विधानानंतर ढवळीकर बंधूंनी दिल्लीला जाऊन भाजपचे वरिष्ठ नेते बी. एल. संतोष यांची भेट घेतली होती. दिल्लीहून परतल्यानंतर दीपक ढवळीकर यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलताना युतीसंदर्भात भूमिका स्पष्ट केल्याने या वादावर पडदा पडला आहे.
स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे युतीबाबत हा संभ्रम निर्माण झाल्याचे दीपक ढवळीकर म्हणाले. भाजपातील एका मंत्र्याने युतीबाबत प्रश्न उपस्थित केला व युतीतून बाहेर पडण्याचे जाहीर आव्हान दिले, तेव्हा त्यासंबंधी स्पष्टीकरण मागण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घ्यावी लागली. युतीची सर्व जबाबदारी या मंत्र्यावर सोपविली आहे का ? हे आम्हाला जाणून घ्यायचे होते.
मगोच्या मतदारांचा भाजपाला लाभ
मुळात मगो व भाजपा हे समविचारी पक्ष असून आमचे मतदारही समान आहेत. दोन्ही पक्षांची मते विघटीत होऊन इतर पक्षांना त्याचा लाभ होऊ नये या हेतुनेच 2012 मध्ये माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूकपूर्व युती करण्यात आली. यावेळी युतीला स्पष्ट बहुमत मिळाले व राज्यात सरकारही स्थापन झाले. त्यानंतर 2017 मध्ये युती तुटल्याने त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसला. वर्ष 2022 च्या निवडणुकीनंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत बोलावून मगो पक्षाशी निवडणूक पश्चात युती करुन मंत्रीपदही बहाल केले. त्यानंतर 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीमुळेच उत्तर गोव्यातून भाजपचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाला. प्रियोळातही त्याला मतांची मोठी आघाडी मिळाली.
दक्षिणेतील जागा हुकली तरी मगोची एकगठ्ठा मते भाजप उमेदवाराला मिळाली. हिंदू मतांची विभागणी होऊ नये व त्यासाठी समविचारी प्रादेशिक पक्ष एकत्र असावेत हे केंद्रातील मोदी सरकारचे प्रयत्न आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मुळात युतीबाबत हीच भूमिका आहे व त्यामुळे युती अतुट राहणार आहे, असे ढवळीकर म्हणाले. मगो पक्षाचे कार्य आठ ते दहा मतदारसंघामध्ये सुरु आहे. फोंडा, प्रियोळ, शिरोडा, मांद्रे यासह डिचोली, म्हापसा, मये आदी मतदारसंघामध्ये मगोचे कार्यकर्ते सक्रीय असून संघटन मजबूत राहण्यासाठी आमचे कार्य सुऊ राहणार आहे. प्रत्येक मतदारसंघात मगोची आठ ते दहा टक्के मते आहेत. निवडणुकीत त्याचा युतीच्या उमेदवाराला निश्चितच फायदा होणार आहे. त्यामुळे कुणीही मगो-भाजपच्या युतीमध्ये संभ्रम निर्माण करु नये, असे दीपक ढवळीकर म्हणाले.