Mahabaleshwar tourism | देशात उन्हाचा हाहाकार, पण महाबळेश्वरात धुक्याची शुभ्र चादर; निसर्गाचे 'हे' रूप पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
मे महिन्यातही गुलाबी थंडीचा अनुभव; महाबळेश्वरात पर्यटकांची गर्दी
प्रतापगड : देशभरात उन्हाच्या झळाअसह्य होत असताना सह्याद्रीच्या कुशीत बसलेल्या महाबळेश्वरने मात्र निसर्गाच्या अनोख्या सौंदर्याची उधळण सुरू केली आहे. दाट धुक्याची शुभ्र चादर, गुलाबी थंडीचा मंद स्पर्श आणि रिमझिम पावसाच्या हलक्या सरींनी संपूर्ण परिसर जणू एखाद्या स्वप्नचित्रासारखा बहरून गेला आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये येथे दाखल होणाऱ्या पर्यटकांना हे निसर्गवैभव अक्षरशः थक्क करून सोडत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वरच्या आकाशात पहाटेपासूनच धुक्याने आपले अधिराज्य प्रस्थापित केले आहे.
उंचच उंच डोंगररांगा, खोल दऱ्याखोऱ्या, घनदाट वृक्षराजी आणि नयनरम्य पर्यटनस्थळे सारे काही धुक्याच्या शुभ्र पडद्याआड लपून जाते आणि काही क्षणांनी पुन्हा हळुवारपणे उलगडते. हे क्षणाक्षणाला बदलणारे दृश्य पाहण्यासाठी पर्यटक विविध पॉइंट्सवर मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. धुक्यातून डोकावणारे हिरवेगार निसर्गचित्र प्रत्येकाच्या मनावर अनामिक मोहिनी घालत असून कॅमेऱ्यांचे शटर सतत क्लिक होत आहेत.
मे महिन्यातही गुलाबी थंडी
देशाच्या इतर भागांत मे उन्हाच्या झळांनी जनजीवन होरपळत असताना महाबळेश्वरात मात्र सकाळी आणि संध्याकाळी गारव्याची सुखद महिन्यात चाहूल जाणवत आहे. उबदार जॅकेट्स आणि शाली गुंडाळून फिरणाऱ्या पर्यटकांच्या चेहऱ्यावरील हास्य सारे काही सांगून जाते. मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या शहरांतून आलेल्या दगदगलेल्या मन-शरीरासाठी महाबळेश्वरचा हा गारवा सुखद वाटत आहे.
पर्यटन व्यवसायाला चांगले दिवस
पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे महाबळेश्वरमधील स्थानिक व्यावसायिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स हाऊसफुल होत असून स्ट्रॉबेरी उत्पादने, ताजे रस, स्थानिक खाद्यपदार्थ आणि हस्तकला बस्तु यांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचे विक्रेते सांगतात.