For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्ञानी भक्तांवर भगवंत प्रेमाचा वर्षाव करतात

06:28 AM Jul 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
ज्ञानी भक्तांवर भगवंत प्रेमाचा वर्षाव करतात
Advertisement

भगवंत म्हणाले, चार प्रकारचे भक्त मला भजतात. पहिल्या प्रकारचा भक्त दु:खाने पिडलेला असतो. दुसरा आत्मज्ञानाच्या प्राप्तीची इच्छा बाळगणारा असतो. तिसऱ्याला द्रव्याची इच्छा असते व चौथ्या प्रकारचा भक्त ज्ञानी असतो. जरी हे सर्व सदाचारी असले तरी पहिल्या तीन प्रकारच्या भक्तांना माझ्याकडून काही ना काही अपेक्षा असते मात्र चौथ्या प्रकारचा भक्त आत्मज्ञानी असल्याने तो माझ्याकडून कोणतीही अपेक्षा न बाळगता केवळ माझ्यावरील प्रेमापोटी माझी भक्ती करत असतो. तो माझेच रूप होतो व माझे रूप होऊनसुद्धा माझी भक्ती करताना भजनपूजनादिक शारीरिक क्रिया करतो. ज्ञानाचा उदय झाल्यामुळे तो स्वत:ला माझा आत्मा समजतो. म्हणून मीसुद्धा आनंदाने ज्ञानी हा माझा आत्मा आहे असे म्हणतो. त्याला व्यवहार कसा करावा हे समजते. त्यामुळे लोकांना त्याचा देह माझ्यापेक्षा वेगळा दिसत असला तरी तो माझ्यापेक्षा वेगळा नसतो. ‘मीच ब्रह्म’ अशा बुद्धीने चित्त स्थिर झालेला तो ज्ञानी मला केव्हाच मिळालेला असतो असं भगवंत पुढील श्लोकात सांगत आहेत. ते म्हणतात,

Advertisement

ज्ञानी वरिष्ठ सर्वात नित्य-युक्त अनन्य जो । अत्यंत गोड मी त्यास तो हि गोड तसा मज ।।7।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, आपापल्या हिताच्या इच्छेने अनेक भक्त मला चिकटू पाहतात परंतु ज्ञानी भक्तावर मी प्रेमाचा वर्षाव करतो. त्याची तुलना गाईच्या वासराशी करता येईल. सगळे दूध वासरानेच पिऊन टाकू नये म्हणून लोक गाईला वासरापासून दूर बांधून ठेवतात पण म्हणून गाईला पान्हा फुटून त्यांना दूध मिळतेच असे नाही. मात्र गाईच्या मनात वासराबद्दलच्या मायेचा पाश बळकट असल्याने ते येऊन गाईच्या कासेला लुचताच त्याला दुध सहज मिळते कारण ते मनाने व प्राणाने दुसऱ्या कोणासही जाणत नाही. जे त्याला पुढे दिसेल त्याला ही माझी आईच आहे असे ते म्हणते. इतके गाईच्या ठिकाणी अनन्य असते, म्हणून गाईचीही त्याच्यावर तशीच प्रीती असते. ज्ञानी भक्ताची माझ्या बाबतीत अशीच अवस्था असते. त्यामुळे मी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो. विशेष म्हणजे आर्त, जिज्ञासू आणि द्रव्याची अपेक्षा करणाऱ्या इतर तीन प्रकारच्या भक्तांना जरी भगवंताकडून भक्तीच्या बदल्यात काही अपेक्षा असल्या तरी ते देखील त्यांचे आवडते असतात. ज्ञानी भक्त हा माझा आत्मा आहे असं भगवंत पुढील श्लोकात सांगत आहेत,

Advertisement

उदार हे जरी सारे ज्ञानी तो मी चि की स्वये । जोडला स्थिर माझ्यात गति अंतिम पाहुनी ।।18।।

माउली म्हणतात, भगवंताची भक्ती करणाऱ्या पहिल्या तीन प्रकारच्या भक्तांना जरी भगवंताकडून भक्तीच्या बदल्यात काही अपेक्षा असल्या तरी ते देखील त्यांचे आवडते असतात. असं जरी असले तरी ज्ञानी भक्ताची गोष्ट काही वेगळीच असते. ज्याप्रमाणे नदी दऱ्याखोऱ्यातून केलेला प्रवास विसरून सागरात मिसळली की, ती मागे फिरायचे नाव घेत नाही त्याप्रमाणे भगवंतांना जाणून तो ज्ञानी भक्त समोर दिसणाऱ्या गोष्टींकडे पाठ फिरवून, त्यांच्यासारखाच होतो.

क्रमश:

Advertisement

.