For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भगवंत म्हणाले, मी स्वत: सुद्धा कर्म करतो

06:12 AM Dec 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
भगवंत म्हणाले  मी स्वत  सुद्धा कर्म करतो
Advertisement

अध्याय तिसरा

Advertisement

भगवंत म्हणाले, जो कर्मफळाविषयी सदैव अनासक्त राहून उत्तम प्रकारे कर्तव्यकर्म करतो, त्याला कैवल्यपद मिळते. ह्या त्याच्या वर्तणूकीमुळे तो जेथे असतो तेथेच मोक्षपद निर्माण होते. तू निरपेक्षतेने कर्माचे आचरण करत असताना तुझ्याकडे पाहून लोकांना तसे वागावेसे वाटेल. येथे जो जन्माला आला त्याला कर्म करणे टाळता येत नाही. अगदी निष्काम स्थितीला पोहचलेल्या, निरिच्छ झालेल्या महान पुरुषांनादेखील लोकांना सदाचाराचा मार्ग दाखवण्यासाठी कर्म करावे लागते. तो ज्याप्रमाणे वागतो त्याप्रमाणे लोक वर्तन करतात, ह्या अर्थाचा

जे जे आचरितो श्रेष्ठ ते ते चि दुसरे जन । तो मान्य करितो जे जे लोक चालवितात ते ।। 21 ।।

Advertisement

हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार जगात थोर लोक जे कर्म आचरतात, ते धर्माला धरूनच असल्याने सामान्य लोक त्यालाच धर्म असे म्हणतात आणि त्याचेच आचरण करतात. लोकांना ते इतके पसंत पडते की, कित्येकवेळा ते देवाला बाजूला सारतात आणि समोर दिसणाऱ्या थोर माणसांचा आदर्श नजरेपुढे ठेवून त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करतात. अशी कित्येक उदाहरणे सांगता येतील. म्हणून श्रेष्ठ लोकांनी, ज्ञानी पुरुषांनी कर्माचा त्याग करू नये. एवढेच नव्हे, तर त्यांनी त्यांचे आचरण जगाच्या कल्याणासाठी विशेष काळजीने केले पाहिजे.

आत्मज्ञानी लोकांनी जगाच्या कल्याणासाठी कर्म केलेच पाहिजे हे सांगताना भगवंत पुढील श्लोकात स्वत:चेच उदाहरण देत आहेत. ते म्हणाले, हे अर्जुना ! या त्रैलोक्यामध्ये मी काही केलेच पाहिजे असे नाही, किंवा माझ्याजवळ नाही अशी कोणतीही गोष्ट नाही, तरीपण मी कर्म करतच आहे.

करावे-मिळवावेसे नसे काही जरी मज । तिन्ही लोकी तरी पार्था कर्मी मी वागतो चि की ।। 22 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली सांगतात, भगवंत अर्जुनाला म्हणाले, आता दुसऱ्या कुणाच्या गोष्टी तुला कशाला सांगू ? मी देखील कर्ममार्गाने वागतो आहे हे तू प्रत्यक्ष पाहतोच आहेस. मला काही कमी आहे किंवा फळाची इच्छा धरून मी धर्माचे आचरण करत आहे अशातला भाग नाही. पूर्णतेच्या दृष्टीने पहिले असता माझ्यासारखा दुसरा जगात कोणीही नाही तसेच सर्व प्रकारचे सामर्थ्य माझ्यात आहे. माझ्या अफाट सामर्थ्याबद्दल बोलायचे झाले तर एकच गोष्ट सांगतो. ती म्हणजे मी माझ्या सद्गुरूंचा, सांदिपनी ऋषींचा मेलेला, काळाच्या दाढेत गेलेला मुलगा परत आणून दिला. इतका मी सामर्थ्यवान आहे. तरीही कर्ममार्गाचे आचरण करतो.

पुढील श्लोकात ते म्हणतात, जर मी आळसाने असे केले नाही तर ते बरोबरच आहे असे वाटून लोकही माझ्याप्रमाणे निक्रिय होतील आणि त्यांच्या नाशाला मीच कारणीभूत होईन.

मी चि कर्मी न वागेन जरी आळस झाडुनी । सर्वथा लोक घेतील माझे वर्तन ते मग ।। 23 ।।

सोडिन मी जरी कर्म नष्ट होतिल लोक हे । होईन संकर-द्वारा मी चि घातास कारण ।। 24 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतानी अर्जुनाला असे सांगितले की, ज्याप्रमाणे केवळ फळ मिळावे ह्या एकाच उद्देशाने लोक कर्मे करतात त्याच तत्परतेने मी स्वधर्माचे आचरण करत असतो. असे करण्याचे कारण म्हणजे सर्व प्राणीसमूह माझ्यावर अवलंबून आहेत. मी जसे वागतो तसेच तेही वागतात, त्यामुळे मी जर स्वधर्माचे आचरण केले नाही तर तेही कर्मभ्रष्ट होतील आणि मी वर्णसंकर करणारा होऊन, या लोकांच्या नाशास कारण होईन. मी निरिच्छ आहे म्हणून आत्मस्थितीत शांतपणे बसून राहिलो, तर ही प्रजा भवसागरातून कशी बाहेर पडेल?

क्रमश:

Advertisement
Tags :

.