For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भगवंतांनी समाधीत असल्याचे सोंग घेतले

06:39 AM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
भगवंतांनी समाधीत असल्याचे सोंग घेतले
Advertisement

अध्याय एकतिसावा

Advertisement

नाथमहाराज म्हणतात, श्रीकृष्णाच्या निजधाम गमनाच्या प्रसंगाचे साक्षीदार होण्यासाठी समस्त देवगण, यक्ष, राक्षस, किन्नर आदि इतरेजन आपापल्या विमानातून धावून आले. प्रसंगच तसा महत्त्वाचा होता. आकाश त्यांच्या विमानांनी भरून गेले. आकाशात दाटी केलेल्या देवगणांनी हृशिकेशाच्या समोर आल्यावर त्याचा जयजयकार करायला सुरवात केली. सर्वजण एकदमच भगवंतांवर पुष्पवृष्टी करू लागले. त्या पुष्पवृष्टीमुळे स्वर्गातील दिव्य फुलांच्या राशी भगवंतांच्या आजूबाजूला रचल्या गेल्या. त्यामध्ये घन:शाम शोभून दिसत होते. ब्रह्मदेव येऊन भगवंतांच्या पुढे उभे राहिले. सदाशिवांसारख्या अन्य विभूतीही भगवंतांच्या दृष्टीस पडल्या. इंद्रादिक देवही तेथेच होते. त्या सर्वांना पाहून भगवंतांनी कमळाच्या पाकळ्यांसारखे असलेले त्यांचे डोळे झाकून घेतले.

ते स्वत: परिपूर्ण असल्याने डोळे झाकलेले असले काय आणि उघडे असले काय त्यांच्या आत्मस्वरुपात काहीच फरक पडत नव्हता. आपल्याला पाहून भगवंतांनी डोळे का झाकून घेतले हाच प्रश्न सर्व देवगणांना पडला होता. त्याचे उत्तर कुणाला माहित नसल्याने जो तो एकमेकाकडे बघून आश्चर्य व्यक्त करत होता. देवांचा समुदाय बघितल्यावर भगवंतांनी डोळे का झाकून घेतले ह्या सर्वांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर असे की, मागे एकदा श्रीकृष्णनाथ द्वारकेत असताना सर्व देवगण तेथे येऊन त्यांना विनंती करून गेले होते की, आता दीर्घकाळ झाला. आपली उणीव आम्हा सर्वांना जाणवत आहे तेव्हा अवतारकार्य संपवा. तसेच निजधामाकडे जाताना आम्हा सर्वांच्या घरी आवश्य या. प्रत्येकाच्या निवासस्थानाला तुमचे परमपवित्र पाय लागून ते धन्य होऊदेत. आम्ही सर्व तुमचे दास आहोत तेव्हा आम्हा सगळ्यांच्यावर कृपा करा. तेव्हा सर्व देवगणांनी केलेली विनंती मान्य करत भगवंत म्हणाले होते, अवतारकार्य संपवायला अजून थोडा अवकाश आहे कारण हे यादव अत्यंत माजले आहेत. ह्या समस्त यदुकुलाचा नाश करूनच मी निजधामाकडे जाईन. हे काम न करताच मी निजधामाला गेलो तर ह्या यादवांचा नाश करण्यासाठी मला पुन्हा अवतार घ्यावा लागेल. हे काम झाल्यावर निजधामाला जाताना मी आवश्य तुमची इच्छा पूर्ण करीन.

Advertisement

श्रीकृष्णांनी आपली विनंती मान्य केल्याचे पाहून सर्व देवगणांनी आनंद व्यक्त केला होता. सर्वांना असे वाटले की, श्रीकृष्ण आम्हाला वश झाला असल्याने तो आमच्या विनंतीचे उल्लंघन करणार नाही. विष्णूचा अवतार असलेले श्रीकृष्ण आपल्या ऐकण्यात आहेत म्हणजे आपण कुणीतरी महान आहोत अश्या प्रकारचा अहंभाव देवगणांना झाला होता असे म्हणायला हरकत नाही. हा त्यांचा अहंभाव नष्ट करण्यासाठी श्रीहरींनी आपले डोळे झाकून घेतले. देवांचा मोठाच समुदाय तेथे जमला होता. भगवंतांनी असा विचार केला की, आता मी प्रत्येकाकडे जात बसलो तर आधी कोणाकडे जाऊ, नंतर कोणाकडे जाऊ? पुन्हा त्यावरून त्यांच्यामध्ये चढाओढ होणार. मी ज्याच्याकडे आधी जाईन तो स्वत:ला नंतर गेलेल्यापेक्षा श्रेष्ठ समजणार, त्यापेक्षा ह्या सर्वांना ठकवण्यासाठी आपण समाधीत आहोत असे देवांना भासवावे म्हणून भगवंतांनी डोळे झाकून घेतले. तसं बघितलं तर भगवंतांना समाधी काय आणि व्युथान म्हणजे भानावर असणे काय दोन्हीही साखेच होते कारण ते स्वत: परिपूर्ण परब्रम्ह होते. तरीही डोळे झाकून समाधीत असल्याचे सोंग त्यांनी घेतले होते. योगीजनांना स्वेच्छामरण घेता येते. स्वेच्छा मरण घेऊन ते स्वत: अग्निकाष्ठे भक्षण करून स्वदेह जाळून परब्रम्हात विलीन होतात. श्रीकृष्णांना काही तसे करायची गरज नव्हती. अर्थातच ही गोष्ट केवळ त्यांनाच माहित होती.

क्रमश:

Advertisement
Tags :

.