मन आत्मविचारावर स्थिर करण्यासाठी भगवंतांनी तीन युक्त्या सांगितल्या
भगवंत म्हणाले, मनुष्य प्रपंचात येणाऱ्या संकटांना भीत असतो पण त्याची बुद्धी एकदा धैर्ययुक्त झाली की, त्याला आयुष्यात जे जे घडेल ते सोसण्याचे, निभावण्याचे आत्मिक बळ येते. ह्या अर्थाचा धरूनि धीर बुद्धीने निवर्तावे हळू हळू । आत्म्यात मन रोवूनि काही चिंतू नये स्वये ।। 25 ।।
हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार, धैर्ययुक्त बुद्धी मनाला आत्मानुभवात कायमचे स्थिर करते.
धैर्ययुक्त बुद्धी जर मनात स्थिर होत नसेल तर भगवंत पुढील श्लोकात मनाला आत्मविचारात गुंतवण्याची आणखी एक सोपी युक्ती सांगतात. ते म्हणतात, मन हे चंचल असल्याने त्याला एका ठिकाणी स्थिर करणे कठीण असते हे गृहीत धरून ते जेव्हा जेव्हा आत्मविचार करण्यापासून बाजूला जाते तेव्हा साधकाने भान ठेऊन ते जेथे धाव घेत असेल तेथून त्याला ओढून काढून आत्मविचारात गुंतवावे.
भगवंतांनी चंचल मनाला वळण लावण्यासाठी सांगितलेल्या उपायाला धरून श्रीगोंदवलेकर महाराज प्रवचनातून एक गोष्ट सांगतात ती अशी, ते म्हणतात, तुम्ही जप करत असताना मनात अनेक विचार येतील आणि तुमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतील पण तुम्ही न डगमगता त्यावर असा उपाय करा की, मनात आलेल्या विचारांना आणखीन फाटे फोडू नका. त्यांना तिथल्यातिथे थांबवण्याचा सराव करा. हे करणे तुमच्या हातात आहे. उदाहरणार्थ तुम्ही उद्या सकाळी गावाला जाणार आहात तर त्या संबंधीचे विचार तुम्ही जप करताना मनात येणे साहजिकच आहे. तसे ते आल्यावर त्यांना तिथल्या तिथे थांबवा, नाहीतर उद्या सकाळी आपली गाडी पहाटे आहे, आपल्याला वेळेवर जाग येईल की नाही, गाडी वेळेवर सुटेल का, अपेक्षित ठिकाणी वेळेवर पोहोचून आपले नियोजित काम होईल का, असे अनेक विचारांचे फाटे आपण मनात आलेल्या मूळ विचाराला आपण फोडत असतो. ते टाळा.
भगवंत पुढील श्लोकात सांगतायत की, अशावेळी भरकटलेल्या मनाला आत्मस्वरुपावर स्थिर करण्याचा प्रयत्न करा. फुटेल जेथजेथूनि मन चंचळ अस्थिर। तेथतेथूनि बांधूनि लावावे आत्म-चिंतनी।। 26 ।। श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, आता तू जो निश्चय करशील त्याच्या बाहेर मन कधी जाणार नाही हा नियमच जिवाभावापासून तू आपलासा कर. जर एवढ्याने मन स्थिर झाले तर सहजच काम झाले आणि जर येवढ्याने ते स्थिर झाले नाही तर त्याला मोकळे सोडून दे. मग मोकळे सोडले असता ते जेथे जेथे जाईल तेथून त्याने आत्मस्वरुपावर स्थिर व्हायचे आहे हा नियमच त्यास परत घेऊन येईल.
मन चंचल आणि अस्थिर असते. त्याला आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करण्यासाठी भगवंतांनी तीन युक्त्या सांगितल्या. भगवंत म्हणाले, ईश्वर आपला पाठीराखा आहे आणि तो जे घडवून आणेल ते आपल्या हिताचेच असेल अशी खात्री झाली की, मनुष्य प्रपंचाच्या काळजीतून मुक्त होतो. त्याला धीर मिळतो आणि त्या धैर्याचा उपयोग करून तो त्याचे चित्त आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करतो पण प्रपंचाची काळजी इतक्या सहजासहजी माणसाच्या मनातून जात नाही म्हणून ते जेथे धाव घेत असेल तेथून ओढून काढून त्याला आत्मविचारात गुंतवावे. जर येवढ्याने ते स्थिर झाले नाही तर त्याला मोकळे सोडून द्यावे. त्याला मोकळे सोडले असता ते जेथे जेथे जाईल तेथून त्याने आत्मस्वरुपावर स्थिर व्हायचे आहे हा नियमच त्यास परत घेऊन येईल.
