कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Vari Pandhrichi 2025: कैलासीचा राणा झाला पांडुरंग

03:31 PM Jun 28, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

मीरा उत्पात-ताशी :

Advertisement

सारे ईशतत्व एकच आहे. तिथे कुठल्याही प्रकारचा भेद नाही. हा साक्षात्कार आपल्याला संत शिरोमणी नरहरी सोनार यांचे जीवन चरित्र पाहिल्यावर होतो. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आधी जन्मास आलेले नरहरी सोनार कट्टर शिवभक्त होते. त्यांची दुसऱ्या देवावर अजिबात श्रद्धा नव्हती. ते पंढरपुरात राहत असून देखील त्यांनी कधी विठ्ठलाचे दर्शन घेतले नव्हते. एवढेच काय ते मंदिराच्या कळसाकडे सुद्धा पहात नसत.

Advertisement

नरहरी सोनार यांच्या जन्मानंतर बाराव्या दिवशी त्यांच्या घरी चौदाशे वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेले चांगदेव महाराज आले. त्यांनी बाळाला आशीर्वाद देऊन त्याचे नाव नरहरी ठेवले. चांगदेवांनी हा मुलगा दीर्घायुष्यी होईल. थोर विठ्ठलभक्त होईल, असे भाकीत वर्तवले. मात्र, लहानपणापासून नरहरी मनापासून शिवभक्ती करत असे. रोज घराजवळच्या मल्लिकार्जुन मंदिरात शिवपूजा करून बिल्वपत्र वाहण्याचा त्याचा नेम होता. मोठा झाल्यावर नरहरीला नाथ संप्रदायातील गहिनीनाथ महाराज यांच्याकडून गुरू उपदेश आणि नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली. नरहरीचे लग्न मंगळवेढ्याजवळच्या ब्रह्मपुरी गावातील गंगाबाईशी झाले. शिवस्मरण करत त्यांचा संसार सुखात सुरू होता. पंढरपुरात महाद्वारात त्यांचे दुकान होते. त्यांची सोनारकामातील कलाकुसर खूप प्रसिद्ध होती. त्यामुळे त्यांच्याकडून दागिने तयार करून घेण्यासाठी नेहमी लोक येत असत. विठ्ठलाला देखील त्यांच्या शिवभक्तीचे कौतुक होते. परंतु, त्याचा टोकाचा कट्टरपणा मोडून सर्व ईशतत्व एकच आहे, हा साक्षात्कार नरहरीला करण्याचे विठ्ठलाने ठरवले.

गावात एका सावकाराला विठ्ठलाला केलेल्या नवसामुळे पुत्ररत्न झाले. त्यामुळे त्याने विठ्ठलाला कमरेची सोनसाखळी अर्पण करण्याचे ठरवले. नरहरी सोनार हे उत्तम कारागीर असल्याने त्यांनीच विठ्ठलाची सोनसाखळी तयार करावी, म्हणून ते त्यांच्याकडे आले. पण नरहरी सोनारांनी मात्र या गोष्टीला स्पष्टपणे नकार दिला. कारण ते शंकरा शिवाय कुठल्याही देवांचे तोंड बघत नव्हते. मग विठ्ठलाला सोनसाखळी कशी करणार? सावकाराला तर नरहरींकडूनच सोनसाखळी करून घ्यायची होती. यावर एक उपाय म्हणून सावकारांनी विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून नरहरीला द्यायचे, असे ठरवले. या प्रस्तावला नरहरी सोनार यांनी होकार दिला.

दुसऱ्या दिवशी सावकारांनी विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून दिले. नरहरीने उत्कृष्ट कलाकुसर करून सुंदर सोनसाखळी तयार केली. सावकाराला ती सोनसाखळी पाहून खूप आनंद झाला. त्याने मंदिरात जाऊन विठ्ठलाला ही सोनसाखळी घातली. परंतु ती एक वितभर मोठी झाली होती. सावकाराने नरहरी सोनाराला ती सोनसाखळी कमी करायला सांगितले. परत माप घेऊन सोनसाखळी तयार केली. ती विठ्ठलाला घातली. तर आता ती लहान झाली. परत एकदा तिचे माप घेतले ते जास्त झाले. असे सारखे घडू लागल्याने नरहरी गोंधळून गेले. अगदी बरोबर मापाप्रमाणे साखळी तयार करून सुद्धा सारखे असे का होत आहे, या विचारात ते पडले. शेवटी त्यांनी स्वत:च्या डोळ्यावर पट्टी बांधून विठ्ठलाच्या कमरेचे माप घेण्याचे ठरवले. डोळ्यावर पट्टी बांधून नरहरी विठ्ठलाच्या मूर्ती समोर गेले आणि हातातली सोनसाखळी कमरेला बांधू लागले. त्यावेळी त्यांच्या हाताला व्याघ्र चर्म लागले. त्यांनी आपले हात गळ्यापर्यंत नेले तर गळ्यात शेषनाग असल्याचे जाणवले. नरहरीने आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली. बघतात तर काय समोर विठ्ठलाची मूर्ती! पुन्हा त्यांनी घाई घाईने डोळ्यावर पट्टी बांधली आणि परत माप घ्यायला सुरुवात केली, तर परत तोच अनुभव त्यांना आला. त्यामुळे ते खूप गोंधळून गेले. शेवटी त्यांच्या हे लक्षात आले की पांडुरंग म्हणजेच शंकर आहे आणि शंकर म्हणजेच पांडुरंग आहे. सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहेत. या साक्षात्कारामुळे ते विठ्ठलाला शरण गेले. आपला वेडा अट्टाहास त्यांच्या लक्षात आला. आणि मग पुढील आयुष्यात ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये रमून गेले.
वेगवेगळ्या व्यवसायातील विठ्ठल भक्तांनी आपल्या व्यवसायातच विठ्ठल पाहिला. त्या प्रतिमा वापरून अभंग रचना केल्या. नरहरी सोनारांनी देखील सोनार कामातील प्रतिमा वापरून

देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार 
मन बुद्धीची कातरी राम नाम सोने चोरी
नरहरी सोनार हरीचा दास भजन करी रात्रंदिवस

हा अभंग रचला. त्यांचे इतर अभंगही उच्च अध्यात्मिक पातळी दर्शवणारे आहेत.
नरहरी सोनार विठ्ठलाचे नामस्मरण करत करत विठ्ठलामध्ये एकरूप झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 92 वर्षाचे होते. त्यांची समाधी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराच्या जवळ आहे. त्यांच्या समाधी सोहळ्याला साक्षात विठ़ु माउली, रूक्मिणी माता, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, चोखामेळा, नामदेव आदी उपस्थित होते. अशी ही तुमची आमची विठु माउली! भक्तांसाठी सगुण साकार होऊन आपल्या भक्तांचे लाड पुरवत आहे!

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official
Next Article