For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विश्वाला जीवनरस भगवंतांनी बहाल केला आहे

06:42 AM Jul 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
विश्वाला जीवनरस भगवंतांनी  बहाल केला आहे
Advertisement

भगवंत म्हणाले, आत्मस्वरूप सोडून जो प्रपंच असतो ते विज्ञान होय. हा प्रपंच खरा आहे असे माणसाला वाटत असते कारण त्याच्या ज्ञानावर अज्ञानाचे पांघरूण पडलेले असते. मायेने निर्माण केलेल्या सर्व वस्तूंचे आकार वेगवेगळे असले तरी ईश्वराच्या दृष्टीने त्यांच्या किमती सारख्याच असतात. ईश्वराचे सगुण रूप असलेले संत त्यांच्या वागणुकीतून ते दाखवूनही देत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व जग विष्णुमय आहे त्यामुळे भेदाभेद करणे अमंगल आहे. म्हणून कुणाचा द्वेष, मत्सर करू नका. ह्याला अभेदभक्ती असे नाव असून ती ईश्वराला अत्यंत प्रिय आहे. ईश्वर त्याच्या इच्छेनुसार जगाची निर्मिती करतो आणि त्याला कंटाळा आला की ते नष्ट करून टाकतो. मधल्या काळात माया प्राण्यांकडून कर्माकर्मांचे व्यवहार करून घेते. पुढील श्लोकात भगवंत सांगतात, हे धनंजया, माझ्याहून वेगळे असे दुसरे काही नाही. ज्याप्रमाणे सोन्याच्या तारेमध्ये सोन्याचे मणी ओवावेत त्याप्रमाणे हे सर्व जग माझ्यामध्ये गुंफलेले आहे.

Advertisement

दुसरे तत्त्व नाही चि काही माझ्या पलीकडे । ओविले सर्व माझ्यात जसे धग्यामधे मणि ।।7।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, विश्वाची निर्मिती आणि क्षय हे त्यांच्याच हातात आहे ही कल्पना स्पष्ट करताना भगवंत म्हणाले, सूर्याच्या किरणातून मिळणाऱ्या उष्णतेमुळे मृगजळ दिसते पण म्हणून कुणी त्या किरणांमुळे मृगजळाची निर्मिती होते असे मानत नाहीत. मृगजळ सूर्यामुळेच निर्माण होते हे सर्व मान्य करतात. त्याप्रमाणे अर्जुना, जरी पराप्रकृतीपासून विश्व निर्माण होते आणि तीच त्याचा नाश करते असे दिसत असले तरी त्याला मीच कारणीभूत असतो. हे सर्व माझ्यामध्येच सामावलेले आहे. हे तुला समजावून सांगण्यासाठी एक उदाहरण देतो. ज्याप्रमाणे सोन्याचे मणी करून सोन्याच्या दोऱ्यात ओवले तर एकसंध अशी माळ तयार होते, जरी दोरा व मणी वेगवेगळे दिसत असले तरी तो दागिना घट्टपणे दोरी आणि मणी ह्यात गुंफलेला असतो. म्हणून तो एकजिनसी दिसतो. त्याप्रमाणे मी व विश्व वेगवेगळे दिसत असलो तरी ह्या विश्वातला जीवनरस माझ्यामुळेच अस्तित्वात आलेला आहे.

Advertisement

भगवंतांनी ह्या विश्वाला जीवनरस कसा बहाल केला आहे ते पुढील श्लोकात सांगत आहेत. ते म्हणतात, हे कौंतेया, उदकातील रस मी आहे, चंद्र-सूर्यांमधील प्रभा मी आहे, सर्व वेदांमधील ओंकार मी आहे. आकशातील शब्द व पुरुषांमधील पौरुष मी आहे.

पाण्यात रस मी झालो चंद्र-सूर्यी प्रकाश मी । ओं वेदी शब्द आकाशी पुरुषी पुरुषार्थ मी ।। 8।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंत अर्जुनाला म्हणाले, प्रत्येक वस्तुचे एक वैशिष्ठ्या असते आणि त्यामुळे त्या वस्तूचे अस्तित्व ठळकपणे उठून दिसते ते वैशिष्ठ्या म्हणजेच माझी त्या पदार्थातील उपस्थिती होय. मागील श्लोकात दिलेल्या उदाहरणामध्ये माळेतील मणी उठून दिसतात पण त्यामागील त्या मण्यांना एकत्र धरून ठेवणारी पण सहजी न दिसणारी सोन्याची तार असते तसेच सृष्टीतील निरनिराळ्या वस्तूत असलेले ईश्वरी अस्तित्व सहजी दिसत नसले तरी अत्यंत महत्त्वाचे आहे.

क्रमश:

Advertisement
Tags :

.