For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भगवंताचे अर्जुनावर निरातिशय प्रेम होते

06:11 AM May 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
भगवंताचे अर्जुनावर  निरातिशय प्रेम होते
Advertisement

भगवंत म्हणाले, जे योगी मनाला अस्वस्थ करणाऱ्या सुखदु:खाच्या भावनेने विचलित होत नाहीत, सर्वांशी समबुद्धीने वागतात, ते तीर्थराज झालेले असतात. त्यांच्या दर्शनाने समाधान होते, त्यांची संगत जो करतो तो ब्रह्मपदास पोहोचतो. तो स्वात्मसुखात तल्लीन होऊन, चीत्ताचे संयमन करून, निरिच्छ आणि अपरिग्रह होऊन एकांतात आत्मानुभवात तल्लीन असतो. ह्या अर्थाचा

Advertisement

साधके चित्त बांधूनि इच्छा संग्रह सोडुनी । आत्म्यास नित्य जोडावे एकांती एकलेपणे ।। 10 ।।

हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार ब्राम्ही स्थिती प्राप्त झालेला योगी परब्रह्माशी एकरूप झालेला असल्याने सर्व विश्व ब्रह्मव्याप्त असल्याचा अनुभव घेत असतो. त्याला कशाचा साठा करावासा वाटत नाही. असे पुरुष लोकोत्तर असतात. श्रेष्ठ योगी असलेल्या श्रीकृष्णाची महती सांगताना माउली म्हणतात, तो ज्ञानी मंडळीत सर्वश्रेष्ठ आहे, दृष्टीचा प्रकाशक आहे, त्याचा संकल्प विश्वाची उभारणी करतो. भगवंतांनी अर्जुनास ते ब्रह्म तू आहेस असा स्पष्ट बोध मुद्दामच केला नाही. तसे केले असते तर तो त्यांच्याशी एकरूप झाला असता. असे घडू नये म्हणून दोघांच्यामध्ये द्वैताचा पातळ पडदा ठेवला. साधूच्या अद्वैतस्थितीच्या वर्णनाने अप्रत्यक्ष महावाक्याचा बोध तर केला पण त्याचवेळी देव व भक्त यांची मने प्रेमसुख भोगण्याकरता वेगळी राहतील अशी व्यवस्था केली. अर्जुनाला तुझ्यामाझ्यात ब्रम्ह ऐक्य झाले आहे असे सांगितले तर आपल्यातील द्वैत नष्ट होईल मग मी एकट्याने काय करावे? अशी भीती भगवंतांना वाटली असावी. अर्जुन त्यांचा अतिशय आवडता होता. आपला उपदेश ऐकून अर्जुनाचे आपल्याशी ब्रह्मऐक्य होईल आणि मग मी एकटाच उरीन अशी चिंता भगवंतांना सतावत होती. ते मनात म्हणत होते, दृष्टीनेच पाहून शांत व्हावे किंवा तोंड भरून बोलावे अथवा कडकडून आलिंगन द्यावे असे अर्जुनाशिवाय दुसरा कोण आहे? आपल्या मनाला आवडणारी गोष्ट कोणाला तरी सांगितल्याशिवाय चैन पडत नाही पण अर्जुनाचे आपणाशी ऐक्य झाले तर ती कुणाला सांगायची? ही अडचण लक्षात घेऊन योगेश्वर असलेल्या भगवंतांनी योगीराज म्हणून स्वत:चीच लक्षणे न सांगता, आपण कुणा दुसऱ्याबद्दलच सांगतोय अशी युक्ती करून ब्रह्मप्राप्ती झाल्यावर योगीराज वागतो कसा हे अर्जुनाला सांगितले. त्यांनी अर्जुनाचे अर्जुनत्व कायम ठेऊन आपल्या मनाने अर्जुनाच्या मनास आलिंगन दिले. अर्जुन हा श्रीकृष्णाचा सौख्यविसावा होता. त्याच्या दर्शनात, त्याला मिठी मारण्यात श्रीकृष्णाचे सौख्य दडलेले आहे. जणू काही अर्जुन ही श्रीकृष्णाच्या सुखासाठी ओतलेली मूर्ती आहे. ज्याप्रमाणे म्हातारपणी एखाद्या वांझ स्त्राrला एकुलते एक मूल झाले तर त्या स्त्राrच्या रूपाने मूर्तिमंत मोहच वावरत असतो. तशी देवाची स्थिती झाली. अर्जुनाविषयी देवाच्या प्रेमाचा अतिरेक माउलींनी पाहिलेला असल्याने त्यांनी वांझोट्या बाईची उपमा देवांना दिली. आश्चर्य पहा, की भगवंताचे अर्जुनाचे ठिकाणी प्रेम कसे आहे! कोठे उपदेश व कोणीकडे युद्ध! कारण युद्धाचा प्रसंग ही आत्मज्ञानाचा उपदेश करण्याला अगदी अयोग्य जागा आहे परंतु अर्जुनाच्या प्रेमामुळे भगवंतांनी वेळेच्या योग्यतेकडे लक्ष न देता त्याला आत्मज्ञानाचा उपदेश केला.

Advertisement

          क्रमश:

Advertisement
Tags :

.