सर्वात लांब महामार्ग
हे जग नैसर्गिक आश्चर्यांनी भरलेले आहे. मानवाने तंत्रज्ञानाचा विकास करण्याच्या प्रक्रियेत अनेक मानवनिर्मित आश्चर्येही निर्माण केली आहेत. ही मानवनिर्मित आश्चर्ये केवळ प्राचीन काळातच निर्माण झाली आहेत, असे नाही. अलिकडच्या विज्ञान युगातही मानवाने अशा निर्मितींना जन्म दिला आहे, की त्यांचे मानवालाच आश्चर्य वाटावे. पॅन अमेरिकन हायवे हा महामार्ग त्यांच्यापैकी एक आहे. अर्थातच, त्याच्या नावाप्रमाणे तो अमेरिका खंडातील असून ख्ंाडाच्या एका टोकाला दुसऱ्या टोकाशी जोडणारा आहे. तो जगातील सर्वात लांब जातो.
हा महामार्ग अमेरिकेच्या अलास्का प्रांतातील प्रूडो खाडीपासून कॅनडा, अमेरिका, चीली, अर्जेंटिना, मेक्सिको आणि मध्य तसेच दक्षिण अमेरिका असा पसरला आहे. त्याची लांबी 30 हजार मैल किंवा साधारणत: 48 हजार किलोमीटर इतकी आहे. हा एकच सलग महामार्ग नसून ते अनेक महामार्गांचे एक जाळे आहे. अमेरिका खंडाच्या एकंदर 14 देशांमधून तो जातो. त्याच्या मुख्य मार्गाला अनेक इतर महामार्ग जोडले गेल्याने त्याची नेमकी लांबी सांगता येणे अशक्य आहे. नवे मार्ग जोडले गेल्याने प्रत्येक वर्षी त्याच्या लांबीत वाढ होत असते. अनेक अनधिकृत मार्गही या महामार्गाला जोडले गेले आहेत. 1960 मध्ये त्याच्या निर्मितीकार्याला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर 80 च्या दशकाच्या मध्यापर्यंत त्याची निर्मिती पूर्ण झाली. अनेक टप्प्यांमध्ये त्याचे बांधकाम करण्यात आले. प्रारंभी तो अलास्का ते अमेरिकेच्या मेक्सिको सीमारेषेपर्यंत होता. त्यानंतर त्याचा दक्षिण अमेरिकेतही विस्तार करण्यात आला. अमेरिका खंडातील जे देश पूर्वी एकमेकांना जोडले गेले नव्हते, तेही या महामार्गामुळे आता संलग्न झाले आहेत. या महामार्गाच्या प्रारंभीच्या टोकापासून शेवटच्या टोकापर्यंत प्रवास करणे हा अनेक लोकांचा जणू छंद झाला आहे. उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका खंडांना भेट देणाऱ्या अनेक पर्यकटांच्या आकर्षणाचे केंद्र अशी त्याची ख्याती गेल्या चाळीस वर्षांपासून आहे.
या सर्वात लांब महामार्गाला खर्चही तेव्हढाच प्रचंड आला आहे. आजच्या किमतीत सांगायचे तर याच्या प्रत्येक किलोमीटर निर्मितीला किमान 5 कोटी रुपये खर्च झाले आहेत. या प्रकल्पाचा एकंदर खर्च अडीच लाख कोटी रुपये असून यापासून विविध देशांना मिळणारे उत्पन्नही मोठे आहे. ज्या देशांमधून तो जातो, ते देश त्यांच्या दरानुसार या महामार्गावर पथशुल्क (टोल) आकारणी करतात.