दारूभट्टीतच आहे दारुचे ऑफिस !
कोल्हापूर / सुधाकर काशीद :
कोल्हापुरात 140 वर्षांपूर्वी एक दारूभट्टी उघड सुरू होती. चांगली एक-नव्हे दोन नव्हे 200 फुट उंचीची. या भट्टीला धुरांडी होती. ‘कोल्हापुरी रम’ अशीच या रमची ओळख होती. रम कोल्हापुरात तर सहज मिळायची. पण नेव्हीतील सैनिकांसाठी आणि कोल्हापूर संस्थानातील इन्फंट्रीतील सैनिकांसाठी ही रम खास करून पुरवली जायची. ‘पिकतंय तिथं विकत नाही’, या म्हणीप्रमाणे ही ‘कोल्हापुरी’ नावाची रम बाहेरच अधिक खपली जायची. असे सांगतात की, हिवाळ्dयात या रमचा 90 मि.लि.चा एक मोठा घोट घेतला की थंडीच पळून जायची. त्यामुळे सैनिकांच्या वापरासाठी या रमला राजमान्यता होती किंवा कडक थंडीत सैनिकांना या रममुळे एक उबच मिळत होती.
काळ कसा बदलत असतो बघा, महाराष्ट्रात किंवा त्यावेळच्या मुंबई प्रांतात मोरारजी देसाईंच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात दारूबंदी झाली आणि कोल्हापुरातली ही भट्टी बंद झाली. दारू भट्टीच्या त्या विस्तीर्ण जागेतच दारूबंदीची अंमलबजावणी करणारे दारूबंदी ऑफिस सुरू झाले. दारूभट्टीच्या जागेतूनच दारूवर कारवाई सुरू झाली. चोरीछुपे विकताना पकडलेली दारू येथेच जप्त करून ठेवली जाऊ लागली. पण पुन्हा शासकीय धोरणात बदल झाला आणि दारू विक्री खुली झाली. मग या दारूभट्टीच्या जागेतच महाराष्ट्राचे दारू विक्रीशी संबंधित राज्य उत्पादन शुल्क खात्याचे एक्साईज कार्यालय सुरू झाले. आताही या दारूभट्टीतच हे कार्यालय आहे.
कोल्हापूरकरांना तर या जागेची ओळख दारूभट्टी अशीच झाली आहे. दुधाळीत हे कार्यालय आहे. या भागातले लोक आपला पत्ता ‘दारू भट्टीजवळ’ ठअसाच अगदी सहजपणे सांगून जातात . आता याच दारू भट्टीतून स्कॉच व्हिस्की बियर पासून अधिकृत देशी दारू विक्रीची नोंद ठेवली जाते .दारू भट्टीत दारू गाळली जात नसली तरी अधिकृत दारू विक्रीच्या सर्व व्यवहारावरचे नियंत्रण येथूनच केले जाते आणि कोल्हापूरच्या एक्साईज विभागाचे उत्पन्नाचे उद्दिष्ट या दारू भट्टीतच पूर्ण होते .
दारू हा या वास्तूच्या वाट्याला आलेला एक भाग झाला. पण कोल्हापूरच्या जुन्या वास्तूच्या रचना किती भक्कम होत्या आणि किती देखण्या होत्या, याचे एक अस्सल वास्तव या दारूभट्टीच्या निमित्ताने आजही उभे आहे. मूळ इमारत दगडी बांधणीची आणि दारूभट्टीचे विटाचे उंच धुरांडे म्हणजे बांधकाम शैलीचा एक अतिशय उत्तम असा नमुना आहे.
दहा-पंधरा वर्षांपूर्वी चंदन मिरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली या दारूभट्टीचे दोनशे फूट उंच विटाचे धुरांडे चुना, गुळ, डिंक, भाताचा कोंडा अशा पारंपरिक पदार्थांचे मिश्रण करून लिंपून घेण्यात आला होता. दगडी बांधणीची ही दारूभट्टी म्हणजे ब्रिटीशकालीन बांधकामाचा एक उत्तम नमुना आहे. घडीव दगडी भिंतीमुळे या वास्तूत कधीच उकडत नाही आणि थंडीच्या काळात थंडी वाजत नाही.
या परिस्थितीत ही दारूभट्टी म्हणजे एक सुंदर वास्तू म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाने जपण्याचा प्रयत्न केला आहे. आता या विस्तीर्ण जागेत अन्य संलग्न कार्यालय, कर्मचारी क्वार्टर्स करण्याचा प्रस्ताव आहे. पण त्यामुळे दारूभट्टीच्या रचनेला बाधा येणार असल्याने हा प्रस्ताव मान्य होण्याची शक्यता फारच कमी आहे. पण दारूभट्टी या थोड्या विचित्र नावाची ही वास्तू असली तरी खरोखर आजही कोल्हापूरकरांनी एक जुनी वास्तू म्हणून भट्टी पाहण्याची गरज आहे. कोल्हापुरात किती काय काय सुंदर दडून राहिले आहे, याचे ते उदाहरण आहे. उत्तरेश्वराकडून दुधाळी मैदान किंवा रंकाळा तलावाकडे जाणाऱ्या या रस्त्यावर आजही भली मोठीच्या मोठी ही दारूभट्टी आहे.
- पारशी व्यक्तीकडे ठेका
ही दारू भट्टी चालवण्याचा ठेका एका पारशी गृहस्थाने घेतला होता. उसाच्या रसापासून (मळी) रम तयार करत होता आणि अधिकृत मान्यतेने थंडीच्या प्रदेशातील जवानांसाठी ती रम पुरवत होता. ‘कोल्हापुरी रम’ नावानेच हा ब्रँड त्याने तयार केला होता.
- जप्त केलेली दारू नाश
आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केलेली बनावट दारू या दारूभट्टीतील कार्यालयात जप्त करून ठेवली जाते आणि कोर्टाच्या आदेशानुसार ती जप्त दारू पुन्हा कोठे वापरात येऊ नये म्हणून या भट्टीच्या आवारातच स्वतंत्र खड्डे काढून त्यात ती ओतून नाश केली जाते.