For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंहरुपी युएईची ओपेकच्या सर्कशीतून माघार

06:25 AM May 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
सिंहरुपी युएईची ओपेकच्या सर्कशीतून माघार
Advertisement

तेल उत्पादक आणि निर्यातदार राष्ट्रांची ओपेक ही एक श्रेष्ठ संघटना आहे. तिचे वर्णन पेट्रोल डॉलर क्षेत्रातील सर्कशीचा गोल असे करता येईल. या गोलात जो फटफटी चालवतो तो खरा यशस्वी असे म्हटले जात असे परंतु युनायटेड अरब अमिरातीने 1 मे पासून या ओपेकच्या सर्कशीतून माघार घेतली आहे. आखाती युद्धाच्या तणावग्रस्त परिस्थितीत ओपेक सर्कशीतून या सिंहाची माघार मोठी अर्थपूर्ण आहे.

Advertisement

ओपेक संघटनेतून मागील काही वर्षात अनेक सदस्य बाहेर पडत आहेत. कतार इक्विडोर आणि अंगोला यासारख्या देशांनी अलीकडेच ओपेक गट सोडल्यानंतर आता संयुक्त अरब अमिरातीने दिलेला हा झटका मोठा अर्थपूर्ण आहे. त्यामुळे ओपेकच्या सर्कशीतून सिंहाची माघार असेच त्याचे वर्णन करावे लागेल. हा गट सोडणारा एक नवीन देश म्हणून संयुक्त अरब अमिरातीला महत्त्व आले आहे. या घटनेचे साद पडसाद काय उमटतील त्याची चर्चा या लेखात केली आहे.

गट सोडण्याची कारणे

Advertisement

ओपेक ही पेट्रोल डॉलर क्षेत्रातील एक मोठी सर्कस म्हटली पाहिजे. ओपेकमधून संयुक्त अरब अमिरातीने सदस्यत्व सोडून दिले. आपला पैसा काढण्याची घोषणा केली. त्याची प्रमुख कारणे कोणती असतील तर त्यांची हुकूमशाही प्रवृत्ती, उत्पादन काढण्याच्या मर्यादा ही होत. शिवाय प्राधान्यक्रमही बदलत आहेत. त्यामागे काही राजकीय व आर्थिक घटकही आहेत. ओपेक संघटनेने सदस्य राष्ट्रावर तेल उत्पादनाच्या मर्यादा घातल्या आहेत. संयुक्त अरब अमिरातीने उत्पादन क्षमता प्रतिदिन चार दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त तेल उत्पादन करण्यासाठी त्यांनी मोठी गुंतवणूक केली पण त्यांच्या पदरी निराशा आली. ओपेकचे ठराविक कोटा धोरण हे त्यांच्या उत्पादनक्षमतेवर मर्यादा आणते.

वाघाला सर्कशीत दाबून ठेवण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे त्यावर नाराज होऊन युएईने सर्कशीला सोडचिठ्ठी दिली आहे. शिवाय तेलाच्या क्षेत्रात प्राधान्यक्रमही झपाट्याने बदलत आहेत. तेलाच्या मागणीच्या संभाव्य उच्चांकामुळे प्रेरित होऊन आता संयुक्त अरब अमिरातीने उच्च किमती टिकून ठेवण्यासाठी उत्पादन कमी ठेवण्याऐवजी अधिक तेल विकून अधिक महसूल मिळविण्याचा संकल्प ठेवला आहे. हे उच्च ध्येय गाठण्यासाठी आणि अधिक नफा मिळवण्यासाठी अमिरातीला सर्कशीतून बाहेर पडण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता.

शिवाय इराण युद्धामुळे आखातांमधील वातावरण चांगलेच तापले आहे. या निर्णयामुळे ओपेक प्रमुख सदस्य असलेल्या सौदी अरबसोबत ताणलेले संबंध पाहता अमिरातीला बाहेर पडण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नव्हता. आपले ऊर्जा धोरण आक्रमक ठेवावे आणि आपण आपला नफा मिळवावा, या आक्रमक हेतूने त्यांनी सर्कशीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

आखातात तापलेले राजकारण

आखातांमधील राजकारण कमालीचे तापले आहे. होर्मुझच्या सामुद्र धुनीला अमेरिका इराण दोघांनीही नाकेबंदी करून सतावले आहे. त्यांच्यातील या संघर्षामुळे इतर तेल पुरवठा देशांच्या अडचणीत वाढ झाली आहे आणि प्रादेशिक संघर्ष अधिक तीव्र होत असताना निर्माण झालेली कोंडी सोडवण्यासाठी व आर्थिक दबावातून मुक्त होण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीने सर्कशीतून बाहेर पडण्याचा जो निर्णय घेतला आहे तो आपल्या स्वत:च्या आर्थिक प्राधान्यक्रमांची पुनर्व्याख्या करणार आहे. अमिरातीचा हा निर्णय एकाकी नसून तो त्याची कोंडी करण्याच्या इतर आखाती देशाच्या प्रयत्नामुळे त्यांनी घेतला आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.

इराण आणि अमेरिका एकमेकांच्या पायात पाय घालून दोघांनाही पडावे लागत आहे. याने दोघांचे नव्हे तर सगळ्या जगाचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यातून आपली नाहक बदनामी होते हे लक्षात घेऊन संयुक्त अरब अमिरातीने तापलेल्या या वातावरणात जगाला थोडा दिलासा दिला आहे कारण त्यांच्या या धोरणामुळे तेलाचा योग्य आणि न्याय दरात चांगला पुरवठा होऊ शकतो ही अमिरातीने अमेरिका आणि इराण दोघांनाही दिलेली एक जबर चपराक आहे, असेच म्हटले पाहिजे.

संभाव्य परिणामाची तीव्रता

ओपेकच्या सर्कशीतून अमिरातीने माघार घेतल्यामुळे ओपेक आता कमजोर आणि दुर्बळ झाली आहे. तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या तेल उत्पादक देशाने सर्कशीतून बाहेर पडण्याचा जो निर्णय घेतला तो ओपेकला झटका देणारा आहे. संघटनेची एकजूट तर मोडलीच शिवाय जागतिक तेल किमतीवर प्रभाव टाकण्याची अपेक्षित क्षमता कमी झाली आहे आणि अमिरातीची ताकद वाढली आहे. तेलासारख्या चंचल आणि रोज बदलणाऱ्या अर्थकारणात निर्णय घेण्याला फार महत्त्व असते. संयुक्त अरब अमिरातीने असा निर्णय घेतला आहे व तो योग्य आहे. तो निर्णय घेतल्यामुळे अमिरातीचे नुकसान होण्याऐवजी दीर्घकाळात फायदाच होईल कारण जेथे मानसन्मान नाही, आपला फायदाही होत नाही अशावेळी उगाच संघटनेच्या सर्कशीत राहून मृत्यू गोलात फटफटी चालवण्यात काय अर्थ आहे असा विचार करून अमिरातीने जो निर्णय घेतला तो तूर्त तरी योग्य म्हटला पाहिजे. सिंह सर्कशीतून बाहेर पडला म्हणजे आता पंचतंत्रातील कथेप्रमाणे आखातातील तेल उत्पादक राष्ट्रांचे राजकारण कमालीचे रंगणार आहे. ओपेकमधून बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी योग्यवेळी घेतला आणि संघटनेला कोंडीत पकडले हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे.

वाढती स्पर्धा कमालीचा संघर्ष

ओपेक संघटनेतून अमिरातीने माघार घेतली. त्यामुळे होर्मुझमधील कोंडीमध्ये आणखी एक कोलदांडा पडला. आता तेलाच्या राजकारणातील वाढती स्पर्धा, वाढता संघर्ष शिगेला पोहोचत आहे. परिणामाची जटिलता आणि आर्थिक अस्थिरताही संघर्षाकडे घेऊन जात आहे. अमिरातीच्या या निर्णयामुळे इतर सदस्य देश सामूहिक कोट्याऐवजी वैयक्तिक कोटा असावा अशी मागणी करू शकतील. त्यामुळे बाजारपेठेतील आपल्या हिश्याच्या नफ्या तोट्याचा विचार करून आपली मागणी पुढे रेटण्याचा प्रयत्न सदस्य राष्ट्र करतील. तेव्हा या प्रकारच्या स्पर्धात्मक राजकारणामुळे ओपेक संघटनेतील शहकाटशह अधिक वाढत जाईल, असे चित्र दिसत आहे. दीर्घकालीन दृष्टीने विचार करता प्रासंगिकतेचा संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो आणि प्रत्येक सदस्य आपले हित पुढे करण्यासाठी आपल्या शर्यती लादू शकतो. संयुक्त अरब अमिरातीच्या सिंहाची माघार सर्कशीतील इतर प्राण्यांना सुद्धा अस्वस्थ करणारी ठरेल आणि आपापली शिकार संपली की सदस्य संघटनेच्या सर्कशीतून मोकळे होण्याचा प्रयत्न करू लागतील. त्यामुळे ओपेकला आता घरघर लागण्याचा धोका दिसतो आहे. भारताच्या दृष्टीने विचार करता अमिरातीचा हा निर्णय भारताला फायदेशीर आहे कारण स्वतंत्रदर ठरल्यामुळे मैत्रीपूर्ण राष्ट्राशी प्रेमाचे संबंध असल्यामुळे संयुक्त अरब अमिराती भारताला कमी दरात आणि गतीने तेल पुरवठा करू शकेल. आता त्याला इतर देशांच्या पायात पाय घालून खो खो खेळण्याची गरज नाही.

प्रा.डॉ.वि.ल.धारूरकर

Advertisement
Tags :

.