For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वधर्माचे आचरण न करणाऱ्याचे जगणे निरर्थक होय

06:28 AM Dec 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
स्वधर्माचे आचरण न करणाऱ्याचे जगणे निरर्थक होय
Advertisement

अध्याय तिसरा

Advertisement

भगवंत अर्जुनाला म्हणाले, तू स्वधर्माचे आचरण कर. जो स्वधर्माचे आचरण करतो, त्याला काहीही बाधत नाही. स्वधर्मरूप यज्ञाच्या आचरणाने तुम्ही देवांचे पूजन केले असता देव तुमच्यावर प्रसन्न होतील, याप्रमाणे तुम्ही परस्परांना संतुष्ट करून आपले कल्याण करून घ्या. ह्या अर्थाचा

रक्षा देवांस यज्ञाने तुम्हा रक्षोत देव ते । एकमेकास रक्षूनि पावा कल्याण सर्व हि  ।। 11  ।।

Advertisement

हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार माणसाने स्वधर्माचे आचरण केले तर देवता संतुष्ट होतात आणि तो जे करेल ते सहजच सिद्धीस जाते. त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.

ह्यातील निरपेक्षतेने काम करण्याची पराकाष्ठा कशाला म्हणता येईल ते सांगणारा एक प्रसंग असा, श्री गोंदवलेकर महाराजांचे श्री ब्रह्मानंद म्हणून एक पट्टशिष्य होते.

एकदा श्री महाराज त्यांना म्हणाले, तुला काय पाहिजे ते सांग, श्री ब्रह्मानंदानी त्या वेळी जे मागितले असते ते त्यांना मिळाले असते परंतु ते श्रीमहाराजांच्या उपदेशाचे तंतोतंत पालन करत असल्याने ते लगेच म्हणाले, मला जर काही द्यायचे असेल तर एव्हढेच द्या की, मला तुमच्याकडे कधीही काहीही मागण्याची इच्छा होऊ नये. श्रीमहाराज त्यांच्या उत्तराने अत्यंत प्रसन्न झाले हे वेगळे सांगायला नकोच.

ब्रह्मानंद महाराजांनी श्रीमहाराजांचे विचारधन अक्षरश: लुटून नेले त्यामुळे ते जिवंतपणीच मोक्षपदी आरूढ झाले. पुढील श्लोकात भगवंत म्हणाले, ब्रह्मदेवानी प्रजाजनांना सांगितले की, स्वधर्माचे आचरण केल्याने तृप्त झालेले देव तुम्हाला प्रिय व हितकर भोग वस्तू देतील. त्यांचा उपभोग घेण्याचा मोह तुम्हाला होईल परंतु त्यांनी दिलेल्या सगळ्याचा स्वत: उपभोग न घेता देवांचा वाटा त्यांना समर्पित करा. असे जो करणार नाही तो चोर

समजावा.

यज्ञ-तुष्ट तुम्हा देव भोग देतील वांछित । त्यांचे त्यांस न देता जो खाय तो एक चोर चि ।।12।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, ब्रह्मदेवानी पुढे असे सांगितले की, मी सांगितल्याप्रमाणे स्वधर्माचे आचरण करू लागलात की, सर्व सुखासह मूर्तिमंत भाग्यच तुमचा शोध करीत तुमच्या पाठीमागे येईल. जर तुम्ही एकनिष्ठपणाने स्वधर्माचे आचरण कराल, तर सर्व ऐश्वर्य प्राप्त होऊन तुमच्या मनात विषयांची इच्छा राहणार नाही.

माऊली पुढे म्हणतात, स्वधर्माचे पालन न करणारा विषयांच्या गोडीवर लुब्ध होऊन उन्मत्त इंद्रियांच्या सांगण्याप्रमाणे वागत असतो. तो ईश्वराला भजत नाही, परमार्थाच्या मार्गावरून वाटचाल करणाऱ्याना भोजन देत नाही,

गुरुभक्ती करत नाही, अंत:करणापासून अतिथींचा आदर करत नाही, त्याला मोठमोठे अपाय होतात. त्याच्याजवळ असलेले सर्व ऐश्वर्य नाहीसे होते. त्याला प्राप्त असलेले भोगही तो भोगू शकत

नाही.

क्रमश:

Advertisement
Tags :

.