महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जीवाचा गोवा अन् गोवेकरांचा टांगणीला लागलेला जीव...!

06:40 AM Sep 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जागतिक पातळीवरील लोकप्रिय पर्यटन स्थळ, या पलीकडे गोव्याची वेगळी व खास ओळख आहे. गोव्याला एक समृद्ध इतिहास आणि अत्यंत सुंदर संस्कृतीचा वारसा लाभला आहे. या ऐतिहासिक वारशाबरोबरच थक्क करणाऱ्या निसर्ग सौंदर्यामुळे गोवा भारतात येणाऱ्या कोणत्याही पर्यटकाच्या यादीत अगदी वरच्या स्थानी असतो. दुर्दैवाने या अलौकिक सौंदर्याला एक शापही आहे. या नितांत सुंदर राज्याला फक्त भेट देऊन लोकांचे समाधान होत नाही. त्यांना या राज्यात एक तुकडा स्वत:च्या मालकीचा करून हवा असतो. म्हणजे उत्तर भारतातील प्रत्येक बड्या माणसाला त्याचे दुसरे घर गोव्यात असावे, अशी अभिलाषा असते. परिणामी गोवा आता एक सिमेंटचे जंगल होत चालले आहे.

Advertisement

सन् 2005 मध्ये गोवा पोलीस खात्याचे प्रमुख म्हणून काहीकाळ गोव्यात सेवा बजावलेले आयपीएस अधिकारी निरजकुमार यांचे हे गोव्याबद्दलचे निरीक्षण आहे. गुन्हेगारी क्षेत्रावर लिहिलेल्या ‘खाकी फाईल्स’ या पुस्तकात त्यांनी गोव्याबद्दलचे हे निरीक्षण नोंदविले आहे. गोवा पोलीस दलाचे महासंचालक म्हणून त्यांनी अवघ्या अकरा महिन्यांचा कार्यकाळ घालवला. या काळात पर्यटनाआड गोव्याचे सौंदर्य कसे ओरबाडले जात आहे, याचा जणू पंचनामाच त्यांनी आपल्या या पुस्तकातील एका प्रकरणातून केला आहे. किनारी भागात खुलेआम चालणारा अमलीपदार्थांचा गैरव्यवहार व त्यामागील खऱ्या सूत्रधारांचे चेहरेही त्यांनी उघडे पाडले आहेत. निरजकुमार यांनी जे पाहिले व अनुभवले ती गोष्ट वीस वर्षांपूर्वीची. आज हे चित्र त्यापेक्षा कितीतरी अधिक भीषण स्वऊपात वास्तवात उतरलेले दिसते.

Advertisement

गोव्याच्या किनारी भागातील इंच-इंच भूमीवर उत्तर भारतीयांची विशेषत: दिल्लीकरांची नजर आहे. त्यांच्या नजरेस जाणारा येथील जमिनीचा तुकडा घशात  घालण्यासाठी कुठल्याही स्तराला जाण्याची त्यांची तयारी असते. त्यासाठी सर्व यंत्रणांचा कशाप्रकारे वापर करायचा, यातही ते आता वाकबगार बनले आहेत. गोव्यातील जमिनी हडपताना पैसा व बळाचा वापरही सर्रासपणे होऊ लागला आहे. काही महिन्यांपूर्वी आसगाव येथे कुटुंब सदस्यांचे अपहरण करून, त्यांचे राहते घर पाडून टाकण्याचा प्रकार, त्याची एक छोटीशी झलक म्हणा हवी तर! राज्यभर या घटनेवरून संतप्त पडसाद उमटल्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांचा त्यात थेट हस्तक्षेप असल्याचे उघड झाले. त्यांच्या तडकाफडकी बदलीने या प्रकरणावर पडदा पडला. धनदांडगे पर्यटक, चित्रपटसृष्टीतील तारे तारका, स्टार क्रिकेटर यासह उच्च पदस्थ अधिकारी या सर्वांनाच गोव्यात ‘सेकंड होम’ हवे आहे. बऱ्याच जणांचे हे स्वप्न प्रत्यक्षात अवतरले आहे. सुरुवातीला ओसाड जमिनी, नंतर सुपिक शेती आणि आता डोंगरांच्या सपाटीकरणापर्यंत ही मजल पोहोचली आहे. केवळ जमिनीच नव्हे तर गोवेकरांची जुनी घरेही त्यातून सुटलेली नाहीत. घरांसाठीचा हा सारा खटाटोप सुट्टीच्या काळात निवांतपणा घालविण्यासाठी आहे, असेही मुळीच नाही. पर्यटनाच्या नावाखाली फोफावलेल्या विविध गैरधंद्यासाठी ही गुंतवणूक आहे.

गोवा हे देशातील सर्वात छोटे राज्य असून या प्रदेशाचे क्षेत्रफळही तेवढेच आटोपशीर आहे. पण परप्रांतीय धनाढ्यांची जमिनी हडपण्याची ही राक्षसी भूक दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. गोव्याच्या किनारी भागातील जमिनी मिळेल त्या मार्गाने लाटण्याचे आरंभलेले हे सत्र येथील सृष्टीसौंदर्याच्या मुळावर तर उठले आहेच, शिवाय येथील फोफावलेल्या गुन्हेगारीमागील तेही एक मुख्य कारण आहे. परिणामी गोव्यातील पर्यटन क्षेत्राचे एका विकृतीकरणाकडे रुपांतर होऊ लागले आहे. ‘सन, सॅण्ड अॅण्ड सी’ या ओढीने निखळ पर्यटनाचा आस्वाद घेण्यासाठी येणारा पर्यटक गोव्यापासून केव्हाच दुरावला आहे. नाईट पार्ट्यांमध्ये कर्णकर्कश संगीतात झिंगणारी वेगळी पर्यटनीय संस्कृती ही आता या शांत व सुशेगाद राज्याची ओळख बनली आहे. हा अतिरेक दिवसेंदिवस वाढतच चालला असून त्याला आवर घालण्याची ताकद ना गोमंतकीय जनतेत ना येथील यंत्रणेमध्ये उरली आहे. माजी केंद्रीय कायदा मंत्री अॅड. रमाकांत खलप यांनी गोव्याच्या या झपाट्याने पालटणाऱ्या चित्रावर भाष्य करताना, आज गोवा गोवेकरांचा राहिलेला नाही. ज्या गतीने येथील जमिनींची खरेदी व ऊपांतर चालले आहे ते पाहिल्यास येणाऱ्या पिढीसाठी स्वत:चे घर बांधायलाही जमीन उरणार नाही. येथील सरकार उघड्या डोळ्यांनी हे पाहत असून आता गोमंतकीयांनाच आपली भूमी, भाषा व संस्कृती वाचविण्यासाठी डोळे उघडावे लागतील.

गोव्यातील या बदलाचे पहिले बळी कृषीप्रधान व निसर्गसंपन्न असलेले बार्देश व पेडणे हे तालुके ठरले आहेत. काही वर्षांतच या भागांनी वेगळे ऊप धारण केले आहे. येथील किनारी हवा केव्हाच बदलली असून मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ अवतरल्यानंतर येथील सुबत्तेच्या झळाळीत गावांची ओळख लुप्त झाली आहे. त्यात गोव्याचे गोवेपण कुठेच दिसत नाही. आपला गाव व आसपासच्या परिसरात अचानकपणे झालेले हे बदल तेथील संवेदनशील मनांना अस्वस्थ करतात. व्यवस्थेपुढे हतबल झालेले हे लोक विशेषत: काही साहित्यिकांनी, आता आम्ही विकासाचे बळी, अशीच स्वत:ची संभावना केली आहे. गोवा आता तुझा नाही राहिला भावा, असे म्हणण्याची वेळ येथील भूमिपुत्रांवर आली आहे.

सुरुवातीला खाण उद्योगाच्या अतिरेकामुळे गोव्यातील निसर्ग सौंदर्याचा एक समृद्ध पट्टा ओरबाडला गेला. आता या राज्याच्या अर्थव्यवस्थेचा दुसरा मुख्य स्रोत असलेले पर्यटन क्षेत्रही याच मार्गाने वाटचाल करीत आहे. एका विनाशकारी प्रवृत्तीच्या हाती शांत व सुसंस्कृत गोवा सापडलेला आहे. जीवाचा गोवा करणाऱ्या पर्यटकांनी आता गोवेकरांचा जीवच टांगणीला लावला आहे...!

सदानंद सतरकर

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article