नेपाळमधील ‘महाप्रलयाने’ दिलेला धडा
नेपाळ आणि तिबेट सीमेवर आलेल्या भीषण महापुरामुळे शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला असून अद्यापही अनेकजण बेपत्ता असल्याचे समजते. सुरुवातीला भूकंपाचा दावा केला जात असतानाच अमेरिकेच्या भूगर्भ संशोधन संस्था आणि जागतिक तज्ञांनी महाप्रलयामागचे मुख्य कारण सांगितले आहे.
यादुर्घटनेत आतापर्यंत आजवर चौदाशेहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि हा आकडा वाढतंच आहे. अद्याप सहा हजाराहून अधिक लोक बेपत्ता आहेत. बचाव पथकांकडून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात असून, नागरिकांचा शोध घेतला जात आहे. उपग्रह छायाचित्रांच्या तपासणीनुसार भोटेकोसी नदीत हिमकडा आणि खडकांची प्रचंड दरड कोसळल्याने हा महापूर आला, असे नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले. तर कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलगरीचे भूगर्भशास्त्रज्ञ यांनीही असाच अंदाज वर्तवला. त्यांच्या मते, परिसरातील हिमपर्वताचा मोठा तुकडा थेट भोटेकोसी नदीत कोसळला आणि एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले. त्यानंतर पाण्याच्या प्रवाहामुळे हा कठडा एकदाच फुटल्यामुळे अचानक पूरस्थिती निर्माण झाली. भूस्खलन, धरण फुटणं किंवा गाळाचा प्रवाह यांसारख्या घटना याहूनही वेगानं घडू शकतात. सध्याच्या पुरात रसुवा भागातून आलेला उच्चांक गाठणारा जलप्रवाह सुमारे 7.5 तासांत भारतीय सीमेपाशी असलेल्या त्रिवेणी येथे पोहोचला.
भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये एक सामाईक अशी विशाल आणि वेगानं अस्थिर होत चाललेली हिमालयीन नद्यांची प्रणाली आहे, हे त्यातलं महत्त्वाचं कारण आहे. नेपाळमध्ये सहा हजारांहून अधिक नद्या आहेत. त्यापैकी बहुतेक नद्या दक्षिणेकडे वाहत भारतात प्रवेश करतात आणि पुढे गंगेत मिळतात. तिथं नद्यांच्या तीन नदीप्रणाली किंवा खोरी आहेत. पूर्वेकडे कोसी, मध्यभागी गंडकी (भारतात गंडक) आणि पश्चिमेकडे कर्णाली (भारतात घाघरा), तर पश्चिम सीमेवर महाकाली (शारदा) नदी आहे. शिवालिक आणि चुरे पर्वतरांगांतून उगम पावणाऱ्या बागमती, कमला, राप्ती आणि बाबई यांसारख्या एक डझन लहान नद्या तुलनेनं कमी परिचित आहेत. मात्र, त्यांची पाणलोट क्षेत्रं लहान आणि उताराची असल्यामुळं त्या अधिक वेगानं आणि अनपेक्षितपणे पूर आणू शकतात.
हवामान बदलामुळे गळणाऱ्या हिमनद्यांनी ढळण किंवा बर्फ-खडकाचे तांडव केले का? या घटनेसाठी हवामान बदल हा मुख्य कारण आहे असे ठरवणे कठीण आहे. ही घटना हवामान आणि भौगोलिक घटकांचा संगम असू शकतो. हा नेपाळच्या इतिहासातील एक मोठा अपघात आहे. हिमनदी मागे सरकत आहेत आणि त्याखालील खडकमाळ समोर येत आहेत, जी उष्णता शोषते कारण त्यांचे अल्बीडो कमी आहे आणि हिमनदी मागे सरकताना नेहमीच काही सैल माती आणि कचराही उरतो. त्यामुळे, हे पर्यावरणीय बदल आणि भौगोलिक प्रक्रियेचे मिश्रण वाटते. शास्त्र स्पष्ट आहे: हवामान बदल हिमालयात आधीच सुरू आहे. भारतालाही त्याचा ताण जाणवतो आहे. परमाफ्रॉस्ट वितळत आहे. हा माती किंवा खडकाचा एक थर आहे जो किमान सलग दोन वर्षे शून्य डिग्री सेंटीग्रेड किंवा त्याहून खाली राहतो आणि भरपूर कार्बन साठवतो. 2025 मध्ये ‘सायंटिफिक रिपोर्ट’ मध्ये प्रकाशित एका अभ्यासात, हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पीती जिह्यातील लिंदूर गावात प्रथम परमाफ्रॉस्ट-खराब झालेल्या जमिनीच्या पातळीच्या अन्वेषणात दरवर्षी 7.9 ते -6.8 से.मी. पर्यंतची जमीन लक्षणीय खरवडत असल्याचे आढळले. 1950 ते 2024 या काळातील क्षेत्राचे डेटा सूचित करतात की यामध्ये उत्तरोत्तर वाढ झालेली आहे. 1950 ते 2024 पर्यंतच्या डेटाने या भागातील तापमानात दरवर्षी 0, 02 डिग्री सेंटीग्रेडने वाढ आणि गावात पावसाच्या प्रमाणात बदल दर्शविला आहे. हिमनद्या कमी होत आहेत. लडाखमधल्या द्रास खोऱ्यातील 77 हिमनद्यांचे 2000 ते 2020 मधील उपग्रह प्रतिमांमध्ये असे दिसते की येथे एकूण हिमनद्यांचे कव्हरेज कमी झाले आहे. इस्रोच्या मते, 2016-17 दरम्यान ओळखण्यात आलेल्या 10 हेक्टरपेक्षा मोठ्या 2431 तलावांपैकी, भारतीय हिमालयातील जलप्रवाहाच्या भूभागातल्या तलावांमध्ये 1984 पासून 676 हिमनदी तलाव ‘लक्षणीय प्रमाणांत वाढलेले’ आहेत. यापैकी 130 तलाव भारतात आहेत. 676 हिमनदी तलावांपैकी 601 ने त्यांच्या मूळ क्षेत्रापेक्षा दुपटीपेक्षा जास्त वाढलेले दिसून आले आहेत. वाढत्या हिमनदी तलावांवर ग्लेशिअल लेक आउटबर्स्ट फ्लड्सचा धोका असतो, जसे की 2023 मध्ये सिक्कीममधल्या साउथ लोनाक तलावाबाबत घडले होते. अलीकडच्या दशकांमध्ये हिमालय जलविद्युत, पर्यटन, रस्ते, बोगदे, शहरी विस्तार आणि इतर पायाभूत सुविधांसाठी एक प्रमुख भाग बनला आहे. या हस्तक्षेपांमुळे त्यांनी एकाच वेळी नद्या, उतार, पूरक्षेत्र, जंगले आणि वस्त्या अपरिवर्तनीयपणे बदलल्या आहेत.
प्रा. डॉ. गिरीश नाईक