For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आत्ताच वाजले विधान परिषदेचं बिगुल !

11:22 AM Feb 03, 2025 IST | Pooja Marathe
आत्ताच वाजले विधान परिषदेचं बिगुल
Advertisement

सतेज पाटील-महाडिक यांच्यातच टशन
उमेदवारांची चाचपणी सुरू
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतरच चित्र स्पष्ट
कोल्हापूरः संतोष पाटील
कोल्हापूर विधान परिषदेचं बिगुल २०२६ ला वाजणार आहे. तत्पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींचे सोपस्कार पूर्ण व्हावे लागणार आहे. मात्र, आतापासून आमदार सतेज पाटील यांना घेरण्याची रणनिती आखली जात आहे. सतेज पाटील यांचे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी शेतकरी संघटनेचे सावकर-मादनाईक यांच्या उमेदवारीची घोषणा केली. २००९ पासून होऊ घातलेल्या या चौथ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सतेज पाटील आणि महाडिक गट आमने-सामने येतील, असे संकेत आतापासूनच मिळत आहेत.
विधानसभेच्या २०१४ निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर अल्पकाळात विजयाचा सोपान चढण्याचे दिव्य सतेज पाटील यांनी करुन दाखवले होते. २०२१ च्या निवडणुकीत पालकमंत्री म्हणून सतेज पाटील यांनी बारा तालुक्यांत सर्वपक्षियांशी स्थापित केलेले जिव्हाळ्याचे संबंध, २०१९ पासून कोरोना आणि महापूर या आपत्ती काळात मिळवलेला सर्वसामान्यांचा विश्वास, ‘गोकुळ’च्या निवडणुकीतील ऐतिहासिक विजय, २०१४ पूर्वीची चूक सुधारत सर्वसामान्यांसह कार्यकर्त्यांशी राखलेला थेट-संवाद या त्यांच्या जमेच्या बाजू ठरल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आमदार अमल महाडिक यांनी अचानक माघार घेतल्याने ही निवडणूक आश्चर्यकारकरित्या बिनविरोध झाली होती.
दरम्यान, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या १८ दिवसांपर्यंत समोर तुल्यबळ उमेदवार नसतानाही अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांचा पराभव केला होता. ४०० कोटींच्या विकासकामांचा दावा करूनही पराभवाला सामोरे जावे लागल्याने सतेज पाटील यांच्या राजकारणालाच धक्का बसला. या धक्क्यातून सावरत त्यांनी सिंहावलोकन केले. २०१४ च्या विधानसभेनंतर गोकुळ दूध संघ आणि राजाराम साखर कारखाना निवडणुकीत मात खाल्यानंतरही सतेज पाटील यांनी महाडिक गटाविरोधातील मोर्चेबांधणी कायम ठेवली.
गोकुळ आणि राजाराम कारखाना निवडणुकीत अल्पमतात पराभव स्विकारत त्यांनी पुढील पाच वर्षाची तयारी सुरू ठेवली. दरम्यान, २०१५ च्या कोल्हापूर महापालिका निवडणुकीत सतेज पाटील ताकदीने उतरले. पद आणि राज्यात सत्ता नसतानाही शहरवासियांनी सतेज पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. महापालिकेत २७ नगरसेवक निवडून देत त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष बनवला. २०१५ ची महापालिका निवडणूक सतेज पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीस यू-टर्न देणारी ठरली.
तत्पूर्वी काँग्रेस कमिटीत झालेल्या एका बैठकीत आपले कट्टर प्रतिस्पर्धी तत्कालीन विधान परिषदेचे काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक यांना आपला विरोध कायम असल्याचे याच व्यासपीठावरून त्यांनी जाहीर केले. याचवेळी सतेज पाटील यांनी विधान परिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले. महापालिकेचे संख्याबळ आणि राजकीय ताकदीच्या जोरावर सतेज पाटील यांनी विधान परिषदेची काँग्रेसची उमेदवारी मिळवली. तत्कालीन आमदार महाडिक यांना विधान परिषदेसाठी बंडखोरी करणे भाग पाडले. या लढतीत महादेवराव महाडिक यांचा 62 मतांनी पराभव करत त्यांनी जोरदार कमबॅक केले.
राज्यात सत्ता नसल्याने सतेज पाटील यांनी मिळालेल्या वेळेचा उपयोग करत कार्यकर्त्यांशी तुटलेली नाळ पुन्हा जोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. आता तशीच काहीशी परिस्थिती असली तरी जिह्याच्या आणि राज्याच्या राजकारणाचा भूगोल ३६० अंशात बदलला आहे. जिल्ह्यात मनी आणि मसल पॉवर असणाऱ्या डझनभर नेत्यांचा उदय झालेला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजप ताकदीने पाय रोवून उभी आहे. तुलनेत विरोधी पक्ष आणि काँग्रेसची ताकद अगदीच क्षीण झाल्याचे वास्तव आहे. या काळात सतेज पाटील यांना राज्याच्या राजकारणात मोठी संधी असली तरी राज्याच्या कायदे मंडळात पोहोचणे हे त्यांच्यासाठी महत्वाचे आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर सतेज पाटील यांची ‘वेट अँड वॉच’ भूमिका असली तरी त्यांचे यापुढचे राजकारण हे विधान परिषदेच्या व्युहरचनेभोवतीच फिरणार आहे. विधान परिषदेला सतेज पाटील यांची ताकद किती असणार, हे मधल्या काळात होणाऱ्या कोल्हपूर आणि इचलकरंजी महापालिका, जिल्हा परिषद आणि नगर पालिकांच्या निवडणुका ठरवणार आहेत. तोपर्यंतच महादेवराव महाडिक यांनी जयसिंगपूर येथे शुक्रवारी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांच्या विधान परिषदेच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. सतेज पाटील यांच्या विरोधात मागील वेळीप्रमाणेच त्यांचे राजकीय विरोधक एकटवणार असल्याचे संकेत यातून मिळत आहे. तत्पूर्वी जिह्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडणार आहेत.

Advertisement

विधान परिषदेच विरोधी पक्षनेता शक्य
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दाणवे यांची सदस्यत्वाची मुदत जुन-जुलैमध्ये संपत आहे. सतेज पाटील यांची काँग्रेसमधील पक्षांतर्गत ताकद, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी असलेले जिव्हाळ्dयाचे संबंध पाहता, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता पदाची माळ सतेज पाटील यांच्या गळ्dयात पडण्याची दाट शक्यता आहे. या राजकीय घडामोडीने सतेज पाटील यांच्या राजकीय वाटचालीची आणि जिह्याच्या राजकारणाची दिशा बदलू शकते. दरम्यान होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील राजकारणाचा महत्वाचा टप्पा ठरतील.

Advertisement
Advertisement
Tags :

.