For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विधान परिषदेने उघड केली दोस्ती-दुश्मनी

06:37 AM May 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
विधान परिषदेने उघड केली दोस्ती दुश्मनी
Advertisement

महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली असली तरी या बिनविरोधामागचे राजकारण आता उघड होऊ लागले आहे. काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात पेटून महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी वेगळी होणार असे म्हटले जात असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये किती तीव्र स्पर्धा सुरू आहे हेही उघड झाले. एका अर्थाने दोस्ती आणि दुश्मनी दोन्हीही उघड झाल्या.

Advertisement

विधान परिषदेच्या भाजपच्या पाच उमेदवारांची जाहीर झालेली नावे म्हणजे भाजपचे धक्कातंत्र आहे असे म्हटले जाते. ते सत्य असले तरी त्यापैकी काही निवडण्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जरूर काही विचार आहे. सर्वांचे लक्ष कोल्हे पाटील आणि कर्जतकर या अहिल्यानगर जिह्यातील दोन उमेदवारांच्या निवडीकडे गेले याचे कारण नगर जिह्याचे राजकारण नेहमीच राज्यात चर्चेत असते. कोपरगावच्या कोल्हे कुटुंबात आमदारकी देणे म्हणजे त्यांचे पुनर्वसन तर आहेच. पण, त्याच वेळी तो विखेंना शह देखील आहे. सुजय विखे यांचा लोकसभेला झालेला पराभव लक्षात घेता त्यांना यंदा विधान परिषदेत संधी मिळेल असे समजले जात होते. प्रत्यक्षात कर्जत जामखेडचे कर्जतकर जे मुंडे आणि महाजन यांच्या काळापासून सक्रिय होते त्यांना अचानक लॉटरी लागली. कोल्हे यांना संधी मिळाली याचा अर्थ सुजय यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी त्यांचे पिताश्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरच येऊन पडली आहे. विधान परिषदेत एका नगर जिह्याचे प्राबल्य आहे असे म्हणण्यासारखे राम शिंदे, सत्यजित तांबे असे चर्चेतील चेहरे आधीपासूनच सभागृहात असताना आणखी दोन सदस्य वाढवून विखे आणि आमदार रोहित पवार या दोघांना शह देणारे नेतृत्व भक्कम करण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला आहे, हे दिसून येते. कोकणातून माधव भांडारी यांच्या ऐवजी माजी आमदार प्रमोद जठार यांना संधी, हा देखील जुने हिशोब चुकते करण्याचा प्रयत्न म्हणता येईल. अजित पवार राष्ट्रवादीने झिशान सिद्दीकी यांना दिलेली उमेदवारी हा देखील मुख्यमंत्र्यांचा असलेला समन्वय राखण्याचा प्रयत्न मानला जातो. तसाच तो रावसाहेव दानवे यांच्याबद्दल मानला जाणे धक्कादायक आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे पुन्हा सदस्य म्हणून येतील का याबाबत शाशंकता होती. निरोपाच्या भाषणात त्यांनी केलेले वक्तव्य आणि मंत्रालयीन कर्मचाऱ्यांपासून सर्वांचे मानलेले आभार लक्षात घेतले तर उद्धव ठाकरे ज्या कारणाने विधिमंडळाचे सदस्य झाले ते त्यांचे कारण आता अस्तित्वात नसल्याने पुन्हा ते सभागृहाचे सदस्य होतील हे मानणे तसेही चुकीचे होते. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतानाच त्यांनी आमदारकीच्या राजीनाम्याचीही घोषणा केली होती. मात्र माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या आग्रहावरून त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला नाही. त्यामुळे आपला कार्यकाल पूर्ण होईपर्यंत त्यांनी जबाबदारी पार पाडली असली तरी पुन्हा उद्धव ठाकरे या मैदानात उतरतील अशी चिन्हे नव्हती. मात्र यावेळीही काँग्रेसने महाविकास आघाडीचे नेते म्हणून त्यांनी सभागृहात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यासाठी शिवसेनेला जागा सोडण्याची तयारी दर्शवली. मात्र ऐनवेळी ठाकरे यांच्याकडून अंबादास दानवे यांचे नाव निश्चित करण्यात आले. या नावाबाबत आपणास विचारात घेतले नाही म्हणून काँग्रेसने जी नाराजी व्यक्त केली त्यामुळे शिवसेना भाजपशी तरी जुळवून घेत नाही ना? ही शंका होती की स्वत:चे महत्त्व वाढवून घेण्याचा प्रयत्न होता हे भविष्यात रमेश चेन्नीथला मुंबईत येतील तेव्हा लक्षात येईल. राज्यसभेला शरद पवार यांना आणि विधान परिषदेला शिवसेनेला जागा सोडल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्षाना केले जाणारे ट्रोल एवढेच यामागचे कारण नसावे. किंवा आता दोन वर्षानंतर होणाऱ्या राज्यसभा आणि विधान परिषदेचे गणित ते आता मांडत आहेत असे मानणेही हास्यास्पद ठरेल. अखेर सेना आणि काँग्रेसमध्ये काही बाबतीत झालेले एकमत लक्षात घेतले तर भविष्यातील वाटचाल दोन्ही पक्षाने एकत्र करायचे आहे हा त्यांचा निर्धार यातून दिसून आला आहे.

Advertisement

अर्थात तसाच निर्धार भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये व्यक्त केला जात असला तरी प्रत्यक्षातली स्पर्धा किती तीव्र बनली आहे ते सततच्या घटनांवरून दिसत आहेच. काँग्रेसच्या कथेत होऊ असलेल्या बंडखोरीचा फायदा घेऊन आम्ही तिसरा उमेदवार विधान परिषदेला उभे करतो म्हणणाऱ्या पक्षाने अपेक्षेप्रमाणे निवडणूक बिनविरोध होण्यात हातभार लावला हे विसरता येणार नाही. नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू या दोघांचे आपल्या पक्षात पुनर्वसन करण्यामागे त्यांना भविष्यातही बऱ्याच काही वाटण्या मागायच्या आहेत हे ठरवून निवडी केल्या आहेत असे दिसून येते. त्यामुळे राजकारण मागच्या पानावरून पुढे चालले आहे इतकेच.

शिवराज काटकर

Advertisement
Tags :

.