निठारी हत्याकांडाच्या कायदेशीर अध्यायाची अखेर
अखेरच्या प्रकरणांमध्येही सुरेंद कोलीची मुक्तता : 10 प्रकरणांमध्ये यापूर्वी ठोठावण्यात आला होता मृत्युदंड
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी निठारी हत्याकांडाचा मुख्य आरोपी सुरेंद कोली याला अंतिम प्रलंबित प्रकरणातूनही मुक्त केले आहे. या निर्णयासोबतच कोली विरोधातील सर्व प्रकरणे समाप्त झाली असून न्यायालयाने त्याच्या तत्काळ मुक्ततेचा आदेश जारी केला आहे. हा निर्णय 2006 च्या भयावह निठारी हत्याकांडाच्या 19 वर्षे जुन्या अध्यायाला पूर्णपणे समाप्त करतो. सरन्यायाधीश बी.आर. गवई, न्यायाधीश सूर्यकांत आणि विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला सर्व आरोपांमधून मुक्त केले जात असून त्याची त्वरित मुक्तता करण्यात यावी असे म्हटले आहे.
खंडपीठाने कोलीच्या क्यूरेटिह याचिकेवर सुनावणी करत 2011 च्या निर्णयाला पालटविले असून जुन्या निर्णयात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. अन्य सर्व प्रकरणांमध्ये कोलीला कोलीला यापूर्वी मुक्त करण्यात आले आहे आणि या अंतिम प्रकरणांमध्ये अपुरे पुरावे आणि तपासात गंभीर त्रुटी असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. एकाचप्रकारच्या पुराव्यांवर वेगवेगळे निर्णय देणे न्यायाची थट्टा करण्यासारखे ठरेल. कोलीला आता तुरुंगातून मुक्त करण्याचा निर्देश देण्यात आला आहे, कारण त्याच्या विरोधात अन्य कुठलेही गुन्हेगारी प्रकरण प्रलंबित नाही असे खंडपीठाने म्हटले आहे.
केवळ जबाब अन् चाकू हस्तगत
7 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने कोलीला शिक्षा केवळ त्याचा जबाब आणि चाकू हस्तगत होण्यावर आधारित होती असे म्हटले होते. कोलीला उर्वरित 12 प्रकरणांमध्ये मुक्त करण्यात आल्याने ही स्थिती विसंगतिपूर्ण वाटत असल्याची टिप्पणी खंडपीठाने केली होती.
निठारी प्रकरणाने देशात खळबळ
नोएडाच्या निठारी गावात मोनिंदर सिंह पंधेरच्या घराबाहेर एका नाल्यात 8 मुलांचे सांगाडे 2006 साली सापडले होते. तपासात मोनिंदर सिंह आणि त्याच्या घरातील कामगार सुरेंद्र कोली यांच्यावर हत्या, बलात्कार, नरभक्षण आणि अन्य अमानवयीय कृत्यांचा आरोप ठेवण्यात आला होता. एकूण 16 प्रकरणांमध्ये कोलीला मृत्युदंड ठोठावण्यात आला होता. तर पंधेरला दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरविण्यात आले होते. परंतु 2023 साली अलाहाबाद उच्च न्यायालयाने सर्व प्रकरणांमध्ये दोघांचीही मुक्तता केली होती. न्यायालयाने तपास यंत्रणांच्या बेजबाबदार तपासाला लक्ष्य केले होते.
2009 साली शिक्षा
2009 साली अलाहाबाद उच्च न्यायालयाने 15 वर्षीय मुलीची हत्या आणि बलात्कार प्रकरणी कोलीला दोषी ठरविले आणि पंधेरला पुराव्यांअभावी मुक्त केले होते. कोलीने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते, परंतु 2011 साली त्याची याचिका फेटाळण्यात आली होती. तर 2015 साली उच्च न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा जन्मठेपेत बदलली होती.
2023 साली सर्व प्रकरणांमधून मुक्त
ऑक्टोबरल 2023 मध्ये उच्च न्यायालयाने निठारीशी निगडित 12 प्रकरणांमध्ये कोली तर 2 प्रकरणांमध्ये पंधेरला मुक्त केले होते. यानंतर सीबीआय आणि पीडित परिवारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने 31 जुलै 2025 रोजी या याचिका फेटाळल्या होत्या. आता सर्वोच्च न्यायालयाकडून मंगळवारी 15 वर्षीय मुलीच्या हत्येच्या अंतिम प्रकरणातही कोलली मुक्त केल्याने आता पूर्णपणे स्वतंत्र व्यक्ती ठरला आहे.