पी. एन. पाटील यांच्या कार्याचा वारसा वृद्धिंगत व्हावा
सांगरूळ :
कधीही स्वतःचा स्वार्थ न पाहता अखेरच्या श्वासापर्यंत जनतेची निःस्वार्थ सेवा करणारे कोल्हापूर जिल्ह्यातील जेष्ठ नेते, स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांच्या सामाजिक कार्याचा वारसा अधिक वृद्धिंगत व्हावा, असे प्रतिपादन कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी केले.
स्व. पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विठाई-चंद्राई शैक्षणिक व सामाजिक फाउंडेशन आणि आमदार पी. एन. पाटील प्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी स्वामीजींनी स्व. पाटील यांचे स्मरण करताना सांगितले की, "राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात त्यांनी नेहमीच स्वच्छ आणि प्रामाणिक वाटचाल केली. त्यांची जनसेवेला असलेली निष्ठा आणि बांधिलकी ही प्रेरणादायक होती."
शिबिराचे उद्घाटन अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते स्व. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक विश्वासराव पाटील, भोगावतीचे चेअरमन शिवाजीराव पाटील, माजी जि. प. सदस्य एस. के. पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील, आणि कृष्णात चाबुक यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान शिबिरासाठी जीवनधारा ब्लड बँक व वैभवलक्ष्मी ब्लड बँक यांनी सहकार्य केले. करवीर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यातील पाटील समर्थक आणि रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
शिबिराच्या प्रारंभी विठाई-चंद्राई फाउंडेशनचे संस्थापक प्रकाश मुगडे यांनी स्वागतपर भाषण करताना सांगितले की, "पी. एन. पाटील यांनी राजकारण करताना समाजकारणालाच नेहमी प्राधान्य दिले. त्यांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी रक्तदान शिबिरासारख्या उपक्रमांची गरज आहे."
स्मृतिदिनानिमित्त गेल्या १५ दिवसांपासून जिल्हाभरात विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर त्या उपक्रमांचा एक भाग होता.