Satara News | जिजाऊंच्या माहेरचा वारसा आणि ४०० वर्षांची परंपरा; भुईंजच्या जाधवराव वाड्यात रामजन्मोत्सव सोहळा!
छत्रपतींच्या लेकीचे सासर असलेल्या जाधवराव वाड्यात रामनवमीचा उत्साह
सातारा- सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील भुईंज गाव… आणि त्या गावातील ऐतिहासिक जाधवराव वाडा… जिथे तब्बल चारशे वर्षांची रामनवमी परंपरा आजही भक्तिभावात जपली जात आहे. समर्थ रामदास स्वामी यांच्या सूचनेनुसार प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीमुळे या वाड्याला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लाभले असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
आई जिजाऊंच्या वंशाशी निगडित असलेल्या जाधवराव घराण्याचा हा ऐतिहासिक वाडा, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कन्या राणू अक्का यांचे सासर म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे या वाड्याचे ऐतिहासिक महत्त्व अधिक अधोरेखित होते. सुमारे ३५० ते ४०० वर्षांहून अधिक काळ सुरू असलेली ही रामनवमी परंपरा आजही अखंडितपणे जपली जात आहे.
भुईंज येथील जाधवराव वाड्यात प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती विराजमान असून, रामनवमीच्या दिवशी येथे विशेष पूजा, अभिषेक आणि आकर्षक अलंकारिक सजावट करण्यात येते. शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही भक्तांच्या श्रद्धेने टिकून आहे.
रामनवमी निमित्त वाड्यात भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, गावकऱ्यांसह पंचक्रोशीतील हजारो रामभक्त या उत्सवात सहभागी झाले आहेत. भुईंज गाव ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. येथील जाधवराव वाडा आणि समाधी स्थळ हे भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत असून, रामनवमीच्या निमित्ताने संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे.
सुमारे चारशे वर्षांची परंपरा जपत भुईंज येथील जाधवराव वाड्यात रामनवमी उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा होत असून, या ऐतिहासिक परंपरेमुळे हा वाडा केवळ धार्मिकच नव्हे, तर सांस्कृतिक वारशाचेही महत्त्वपूर्ण केंद्र ठरत आहे.