पाचव्या ‘गॅरंटी’चा आज शुभारंभ
शिमोगा येथे ‘युवानिधी’ला मिळणार चालना : 1.5 लाख जण उपस्थित राहण्याची शक्यता
वार्ताहर /बेंगळूर
राष्ट्रीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शुक्रवार दि. 12 जानेवारी रोजी आपल्या पाचव्या गॅरंटी ‘युवानिधी’ योजनेचा शुभारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे. शिमोगा येथील फ्रीडम पार्कवर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते युवानिधी योजनेचा शुभारंभ होणार आहे. लाभार्थी, युवक व नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री आणि शिमोगा जिल्हा पालकमंत्री मधू बंगारप्पा यांनी केले. दावणगेरे, हावेरी, चिक्कमंगळूर, कारवार आणि चित्रदुर्ग या जिह्यांमधून 1.5 लाख लोक कार्यक्रमाला येण्याची अपेक्षा आहे. युवा निधी योजनेच्या उद्घाटनाबाबत माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपच्या टीकेला आम्ही कृतीतून उत्तर देत आहोत. भाजपने जाहीर केलेली कोणती आश्वासने पूर्ण केली, ते त्यांनी उघडपणे सांगावे, असे आव्हानही मधू बंगारप्पा यांनी दिले. राज्यात गॅरंटी योजना यशस्वी झाल्या आहेत. गृहज्योतीचा योजनेला लाभ 90 टक्के, गृहलक्ष्मी योजनेचा लाभ 93 टक्के, अन्नभाग्य 96 टक्के जणांना मिळत आहे. 200 कोटी महिलांनी शक्ती योजनेतून गेल्या 5 महिन्यांत मोफत प्रवास केला आहे. गरजूंना प्रतिसाद देण्यासाठी राज्य सरकारने विविध योजना राबविल्या आहेत. व इतर विकासकामेही हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन वर्षापर्यंत बेरोजगारी भत्ता
वैद्यकीय शिक्षण आणि कौशल्य विकासमंत्री डॉ. शरण प्रकाश पाटील म्हणाले, पदवी/डिप्लोमा उत्तीर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत नोकरी न मिळालेले युवक-युवती युवानिधी योजनेचे लाभार्थी असतील. या योजनेंतर्गत 2023 मध्ये पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 2 वर्षांपर्यंत बेरोजगारी भत्ता दिला जाईल. तसेच त्यांची स्किल कनेक्ट पोर्टलवर नोंदणी करून प्रशिक्षण दिले जाईल. बेरोजगारांना मदत आणि रोजगार उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचे ते म्हणाले.
5.29 लाख जणांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट
सध्या 61,700 पदवी/डिप्लोमाधारकांनी युवानिधी योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी केली आहे. 2022-23 या शैक्षणिक वर्षात 5.29 लाख विद्यार्थ्यांनी पदवी/डिप्लोमा पूर्ण केला. या सर्वांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. पदवी/डिप्लोमा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यापर्यंत नोकरी न मिळालेले या योजनेचे लाभार्थी होण्यास पात्र आहेत. ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया मोफत आणि सुलभ असल्याचे त्यांनी सांगितले.