वर्षातील शेवटची लोकअदालत 13 डिसेंबरला
प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश मंजुनाथ नायक : पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाच्यावतीने वर्षातील चौथी व शेवटच्या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही लोकअदालत शनिवार दि. 13 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होणार आहे. यंदा गेल्या लोकअदालतीपेक्षा अधिक खटले निकाली काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्ह्या 1तील सर्व न्यायालयांमध्ये या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश मंजुनाथ नायक यांनी दिली.
शनिवारी जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधिशांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नायक म्हणाले, गेल्या लोकअदालतीत दीड लाखाहून अधिक खटल्यांची ओळख करण्यात आली होती. यापैकी 14 हजारांहून अधिक खटले निकाली काढण्यात आले होते. तर कोट्यावधी रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली होती. यंदा गेल्या लोकअदालतीपेक्षाही अधिक खटल्यांची ओळख करण्यात आली असून त्या अदालतीच्या माध्यमातून निकाली काढण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रलंबित खटलेही निकाली काढणार
लोकअदालतीची सर्व तयारी करण्यात येत असून तालुकास्तरावरही सज्जता करण्यात येत आहे. ओळख करण्यात आलेल्या खटल्यांच्या संबंधितांना नोटीस पाठवून आधीच माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार यंदा 20 हजारहून अधिक खटले निकाली काढण्याचे उद्दिष्ठ्या ठेवण्यात आले आहे. गंभीर, क्लिष्ट प्रकरणे, गुन्हेगारी, चेकबाऊन्स, पोलीस केसस, घटस्फोट, शेतजमिनीचे वाद, अपघात व काही विशेष खटल्यांची ओळख करण्यात आली असून, 5 ते 10 वर्षांपासून प्रलंबित खटलेही निकाली काढण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे, असेही नायक यांनी सांगितले.