Satara | आर्थिक वर्षाचा शेवटचा 'काऊंटडाऊन'! साताऱ्यातील शासकीय कार्यालयांमध्ये रात्री उशिरापर्यंत लगबग
साताऱ्यात बिले काढण्यासाठी शासकीय कार्यालये रात्रीही गजबजलेली
सातारा -२०२५-२०२६ या आर्थिक वर्षाची अखेर अवघ्या दोन दिवसांवर आल्यामुळे प्रलंबित कामे उरकण्याची तसेच झालेल्या कामाची बिले काढण्यासाठी जिल्हयातील सर्वच शासकीय कार्यालयात लगबग सुरू आहे. कामे उरकत नसल्यामुळे कार्यालयाची वेळ संपल्यानंतरही अधिकारी, कर्मचारी रात्री उशिरापर्यंत काम करत असल्याचे चित्र आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद याबरोबरच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, पंचायत समिती, तहसीलदार कार्यालये, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी शासकीय कार्यालयात
सध्या वर्षाअखेरीस कामे पूर्ण करण्याची लगबग सुरू आहे. यामध्ये कामांना मंजुरी देणे, मंजूर कामांना निधी वितरित करणे असेल किंवा झालेल्या कामांची बिले काढणे असेल अशा कामांचा निपटारा करण्याचा झपाटा अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे.
कामांचा निपटारा करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत कार्यालये सुरू यामुळे सर्वच शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबरच ठेकेदारांची मोठी गर्दी दिसून येत आहे. परिसरात वाहनांची मोठी गर्दीही दिसत आहे. आपले काम त्वरित व्हावे यासाठीही काही जणांकडून प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे.