इतिहासातील सर्वात मोठे क्रिप्टो हॅकिंग उघड
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
जगातील सर्वात मोठे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज ‘बायनान्स’ हॅक झाले आहे. याला इतिहासातील सर्वात मोठे क्रिप्टो हॅक मानले जात आहे. या हॅकमध्ये 6.3 बिलियन डॉलर्स म्हणजेच अंदाजे 60,000 कोटी रुपयांची क्रिप्टोकरन्सी चोरीला गेली. या घटनेनंतर बिटकॉइन आणि इतर काही क्रिप्टोमध्ये 5 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली आहे. हॅकिंगच्या या प्रकारानंतर कंपनीने डिपॉझिट आणि विथड्रॉवल (पैसे जमा करणे आणि काढणे) तूर्तास स्थगित केले आहे. जोपर्यंत सुरक्षा तपासणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत बायनान्स खात्यांमध्ये नवीन निधी जमा करता येणार नाही, तसेच विद्यमान निधी किंवा क्रिप्टो काढता येणार नाही. या हॅकमागे उत्तर कोरियाचा हात असल्याचा दावा केला जात आहे.
‘बायनान्स’च्या डिजिटल लॉकरमध्ये घुसखोरी झाली आहे. एका हॅकरने ‘बायनान्स’च्या सुरक्षा प्रणालीत घुसखोरी करून हजारो कोटी रुपयांचे क्रिप्टो कॉइन्स चोरले आहेत. क्रिप्टोकरन्सी हे डिजिटल पैशाचे एक स्वरूप असून ते ऑनलाइन खरेदी आणि विक्री केले जाऊ शकते. ते कोणत्याही सरकार किंवा बँकेद्वारे जारी केले जात नाही, परंतु ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे समर्थित आहे. ‘बायनान्स’च्या सुरक्षा प्रणालीतील घुसखोरीनंतर कंपनीने अनेक पावले उचलली आहेत.
‘बायनान्स’चे 100 हून अधिक देशांमध्ये 30 कोटींहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते आहेत. यापैकी 2 ते 2.5 कोटी भारतीय वापरकर्ते असल्याचा अंदाज आहे. तथापि, ‘बायनान्स’ने अद्याप किती वापरकर्त्यांच्या वैयक्तिक खात्यांवर परिणाम झाला आहे, याची नेमकी संख्या जाहीर केलेली नाही. ‘बायनान्स’च्या मते, ही डेटा चोरी त्यांच्या एका डेव्हलपर इंजिनिअरच्या लॅपटॉपच्या हॅकिंगशी संबंधित असू शकते. हॅकर्सनी सर्व्हिस कंटेनर्समध्ये प्रवेश करण्यासाठी आणि अनधिकृत पैसे काढण्याचे आदेश देण्यासाठी या लॅपटॉपचा वापर केला असावा, असा संशय आहे.
हॅकिंगनंतरची सुरक्षितता....
व्यवहार तात्काळ थांबवले : हॅकिंगचा प्रकार लक्षात येताच चोरांना आणखी पैसे काढण्यापासून रोखण्यासाठी ‘बायनान्स’ने ग्राहकांचे डिपॉझिट आणि विथड्रॉवल तात्काळ थांबवले.
परताव्याची हमी : ‘बायनान्स’ने आपल्या ग्राहकांना त्यांचे पैसे सुरक्षित असल्याचे सांगतानाच तपासात ग्राहकांचे कोणतेही नुकसान झाल्याचे सिद्ध झाल्यास कंपनी त्यांना नुकसान भरपाई देईल.
तपास सुरू : कंपनीचे सुरक्षा पथक, आंतरराष्ट्रीय पोलीस आणि सायबर तज्ञांच्या सहकार्याने हॅकर्सचा शोध घेण्यासाठी आणि चोरांचे मार्ग रोखण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे.
